अहिरवाडीत ५० घरांमध्ये पाणी घुसले : पाच कुटुंबांचे स्थलांतर
मंगरूळ, केऱ्हाळा खुर्द, पूनखेडा, बोरखेडा गावांचा संपर्क तुटला; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
शुक्रवारी रात्रीपासून तालुक्यात व सातपुड्यात सततधार पाऊस सुरु असून सुकीनदीसह सर्वच नदीनाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील अहिरवाडीत नागमोडी नदीला मोठा पूर आल्याने काठावरील सुमारे ५० घरांमध्ये पाणी घुसले आहे. पाच कुटुंबाना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली . तर भोकर नदीला पूर आल्याने मंगरूळ, केऱ्हाळा खुर्द, पूनखेडा, बोरखेडा गावांचा संपर्क तुटला आहे. या चारही ठिकाणी असलेल्या पुलावरुन पाणी वाहत आहे. पूनखेडा येथील पुलावर पोलिसांनी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने अहिरवाडी येथील नागमोडी नदीला पूर आल्याने खबरदारी घेत प्रशासनाने पाच कुटुंबांचे त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. येथील धनगरवाडा, बौद्धवाडा, बाहेरपुरा व नवीन प्लॉट एरिया भागातील सुमारे ५० घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी संदीप सावळे यांनी दिली. घरासमोर बांधलेली गुरे नागरिकांनी सुरक्षित स्थळी तातडीने हलवली आहे. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना महसूल प्रशासनाने दिल्या आहेत.
सुकी नदीला मोठा पूर
गारबर्डी धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सुकी नदीला मोठा पूर आला आहे. या पुरात एक जण बेपत्ता झालेला असून त्याची शोधमोहीम सुरु आहे. तर पाल- खिरोदा, कुसूंबा -लोहारा, उटखेडा-कुंभारखेडा या ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. रावेर शहरातील नागझिरी नदीला पूर आल्याने जुना सावदा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.