गुरुजीचा महाप्रताप : दिव्यांग प्रमाणपत्रात तफावत : सुनोदा शाळेतील शिक्षक निलंबित

दिव्यांग प्रमाणपत्रधारकांची तपासणीची मागणी

गुरुजीचा महाप्रताप : दिव्यांग प्रमाणपत्रात तफावत : सुनोदा शाळेतील शिक्षक निलंबित

प्रतिनिधी/रावेर

सुनोदा (ता रावेर येथील) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर वेडू चौधरी यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत तपासणीअंती तफावत आढळून आली आहे. शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या लाभाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने हे प्रमाणपत्र सादर केल्याने शिक्षक ज्ञानेश्वर चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी काढले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्रात तफावत आढललेल्या रावेर तालुक्यातील पहिल्या शिक्षक कर्मचाऱ्याची विकेट पडली असून सादर केलेल्या सर्वच प्रमाणपत्राची तपासणी केल्यास मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिव्यांग नसतांना खोटे प्रमाणपत्र सादर करून कर्मचारी शासकीय लाभ घेत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. रावेर तालुक्यातील सुनोदा येथील शिक्षक ज्ञानेश्वर वेडू चौधरी यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केलेल्या दिव्यांग प्रमाण पत्राची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दिव्यांग मंडळाकडून करण्यात आली. यात तफावत दिसून आल्याचा अहवाल या मंडळाने जिल्हा परिषदेकडे पाठवला होता. त्यानुसार प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे दिसून आले. ज्ञानेश्वर चौधरी यांनी शासकीय सेवाशर्ती नियमांचा भंग केल्याचे दिसून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी त्यांना निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांना पाडळसे ता यावल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तात्काळ हजार होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

अनेक कर्मचारी लाभार्थी

रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून याद्वारे शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे. यापूर्वी रावेर पंचायत समितीतील काही ग्रामसेवकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून याचा लाभ घेतल्याचे उघडकीस आलेले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच शिक्षण विभागासह इतर विभागातही दिव्यांग म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची जिल्हा परिषद प्रशासनाने तपासणी केल्यास वस्तुस्थिती व सत्यता समोर येईल