BREAKING : जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याकडून काकाचा खून : अपघाताच्या बनावाचा डाव पोलिसांनी उधळला
आरोपीला अटक
प्रतिनिधी /रावेर
गारखेडा (ता. रावेर) येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने डोक्यावर काठीने वार करून काकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खु्नानंतर अपघात झाल्याचा बनाव करीत मयत काकाचा मृतदेह नाल्याजवळ कडेला टाकल्याची घटना रावेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून उघडकीस आणली आहे. या प्रकरणी आरोपीस अवघ्या काही तासांत पुतण्या अनिल जखा बारेला रा गारखेडा याला अटक करण्यात आली आहे.
२१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.०० वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६ वर्षे) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची माहिती रावेर पोलिसांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तपास चक्रे फिरवली. घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळवली. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला वय २९ वर्षे, रा. गारखेडा याचे मयतासोबत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते. याच वादाच्या रागातून दि. २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या गंभीर मारहाणीत रामा थावरू बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.
गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकून दिला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत बारकाईने, वैज्ञानिक पद्धतीने व कौशल्यपूर्ण तपास करून हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला असुन, सदर प्रकरणी आरोपी अनिल जखा बारेला याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

krushisewak 
