जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सिईओंचे निंभोरा ग्रामपंचायतीच्या चौकशीचे बिडीओंना आदेश

15 व्या वित्त आयोगातील निकृष्ट कामाबाबत तक्रार

जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सिईओंचे निंभोरा ग्रामपंचायतीच्या चौकशीचे बिडीओंना आदेश

प्रतिनिधी/रावेर

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील 15 व्या वित्त आयोगातून निकृष्ट दर्जाची कामे झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत )यांच्याकडे शुक्रवारी केली आहे. 60 ते 65 लाख रुपये खर्चून ही कामे करण्यात आली असून यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय त्यांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या कामांची बिले अदा करण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे यांनी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस आकलाडे यांची प्रत्यक्ष भेट घेवून शुक्रवारी केली. त्याचवेळी अकलाडे यांनी बिडीओ विनोद मेढे यांच्याशी संपर्क साधून चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीतून आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांचे खरे चेहरे समोर येणार आहेत. यापूर्वी रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते. यात अनेकांना अटक झाली असून 126 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. निंभोरा ग्रामपंचायतीच्या चौकशीतीतून संशयित आर्थिक गैरव्यवहार निष्पन्न झाल्यास या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निंभोरा ग्रामपंचायतीने 15 वा वित्त आयोगातून यापूर्वी 18 ते 21 लाख रुपये स्वच्छ भारत मिशनच्या कामावर खर्च करण्यात आलेले आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच व ग्राम अधिकारी यांनी गावातील वार्ड क्रमांक 1 ते 6 मध्ये पेव्हार ब्लॉक बसवणे, गटार बांधकाम, व कॉक्रिटीकारण करणे यासारखी कामे केलेली आहेत. मात्र ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली असून याची चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी मनोहर तायडे, रेखा कोळंबे व मंदाकिनी बऱ्हाटे या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

आर्थिक गैरव्यहाराचा संशय

निंभोरा ग्रामपंचायतीला 15 वा वित्त आयोगातून गावातील विकास कामे करण्यासाठी मोठा निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. मात्र हा निधी निकृष्ट विकासकामे करून खर्ची टाकून त्याचा गैरव्यवहार होत असल्याचा संशय आहे. निंभोरा ग्रामपंचायत सदस्यांचा पुढील महिन्यात कार्यकाळ संपत असल्याने कामे घाईघाईत उरकून निधी खर्ची टाकण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरु आहेत.

तो गावपुढारी कोण ?

तसेच यापूर्वी झालेल्या बाजार ओटे बांधकाम, पाईप लाईन, कुपनलिका, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा प्रकल्प, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रुपये खर्चून केलेली उपाययोजना कायम वादात असून याचीही चौकशी केल्यास सत्य समोर येईल. या कामातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहारामागे पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी स्वयंघोषित गावपुढारी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये उघडपणे सुरु आहे. तो गावपुढारी कोण हे चौकशीनंतर समोर येणार आहे.