निवडणूक विश्लेषण :आयारामांना भाजपची उमेदवारी, अन्याय झाल्याची निष्ठावंतांची भावना
भाजप पक्षांतर्गत डमेज कंट्रोल कसे करणार ?
प्रतिनिधी/रावेर
रावेर नगरपालिका निवडणुकीचा आखाडा तापायला सरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण १८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्या (दि 21)माघारीची अंतिम मुदत असल्याने पक्षाच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरणाऱ्या अपक्ष उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी आज दिवसभर पक्षाच्या उमेदवारांकडून अपक्षांची मनधरणी करण्यात येत होती. यावेळी माघारीसाठी काही ठिकाणी “डील” झाल्याची चर्चा आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी एकूण १८ अर्ज असून किती उमेदवार माघार घेतात यावर पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे संगीता भास्कर महाजन, कॉंग्रेसतर्फे हमीदाबी अय्युब खा, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातर्फे शबानाबी असिफ मोहम्मद व शिवसेना(उबाठा)तर्फे मनीषा रवींद्र पवार या चौघा महिला उमेदवारांमध्ये अटीतटीची व चुरशीची चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामुळे मत विभाजनाचा फटका कोणत्या उमेदवाराला बसतो हे निकालानंतर दिसणार आहे. उद्या माघारीनंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
रावेर नगरपालिकेची होणारी निवडणूक पक्ष पातळीवर होत असून भाजपने नगराध्यक्ष पदासह एकूण १८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर भाजपने महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेला(शिंदे गट)अवघ्या तीन जागा सोडल्या आहेत. राज्यात महायुतीची सत्ता असताना देखील २४ नगरसेवकांच्या जगासाठी या पक्षाला पुरेसे उमेदवार मिळू शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. प्रभाग ८ (अ), प्रभाग ९ (अ) व (ब) या तीन जागांवर भाजप-सेनेतर्फे उमेदवार दिलेले नाहीत. नगरसेवकांच्या २४ जागांपैकी ७ जागांवर भाजपने आयारामांना संधी दिली आहे. तर जुन्या कार्यकर्त्यांना डावलून पक्षाने अन्याय केल्याची भावना आता नाराज कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. दोन महिन्यापूर्वी पक्षात आलेल्यांना संधी देवून भाजपने नेमके काय साधले आहेउमेदवारी देतांना पक्षाने कोणते निकष लावले हे कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना न उमजणारे कोडे आहे. याची चर्चा आता उघडपणे शहरात सुरु आहे.
नाराज कार्यकर्त्यांमुळे वाढली डोकेदुखी
प्रत्येक प्रभागातून अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे भाजपने सांगितले होते. त्यानुसार इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली. मात्र ऐनवेळी आयारामांना पक्षाने संधी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपला बसण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे. निवडून येण्याची शक्यता असलेल्या डावललेल्या कार्यकर्त्यांची नाराजी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कशी दूर करतात यावर विजयाचे बरेचसे गणित अवलंबून आहे. मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेनेला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर ३ जागांवर उमेदवार न मिळाल्याची नामुष्कीची वेळ भाजपसेनेवर आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने (अजित पवार गट) नगराध्यक्षांसह एकूण १६ जागांवर उमेदवार उभे करीत महायुतीतील मित्रपक्ष भाजप-शिंदेसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. तर काँग्रेसने नगराध्यक्षांसह १० जागांवर उमेदवार उभे केल्याने सर्वच प्रभागात होणारी निवडणूक चुरशीची व अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्या (दि २१) माघारीची अंतिम मुदत असून निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
सत्ता येण्यापुर्वीच अतिक्रमणाला सुरुवात
नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरु असून याचा फायदा घेत शहरात पुन्हा कार्यकर्त्याकडून अतिक्रमण करण्यात येत आहे. येथील बाजार समिती कॉम्प्लेक्समधील दुकानाच्या पुढे दोन दिवसापूर्वी टपरीचा सांगाडा अतिक्रमणाच्या हेतूने ठेवण्यात आला आहे. हे अतिक्रमण भाजपच्या एका कार्यकर्त्याचे असून त्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या उमेदवार आहेत. याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी मतदारांनी केली आहे.

krushisewak 
