निवडणूक : रावेरला काँग्रेसचे नगराध्यक्षांसह 10 जागांवर उमेदवार : महायुतीसह बंडखोरांपुढे आव्हान
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
प्रतिनिधी / रावेर
येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकूण 239 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह 10 उमेदवार दिल्याने भाजप महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व बंडखोरांसमोर कडवे आव्हान उभे राहणार आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादीने (शरद पवार गट) उमेदवार दिले आहेत.
काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षपदासह 10 जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे. उर्वरित प्रभागांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व अन्य मित्रपक्षांच्या उमेदवारांना काँग्रेस सहकार्य करणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती पक्षाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. या भूमिकेमुळे काँग्रेसने स्वतःचा राजकीय ठसा अधोरेखित करत महायुतीसोबतच आतील बंडखोरांनाही कठोर संदेश दिला आहे. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी हमीदाबी अय्युब खा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नगरसेवक पदासाठी अब्दुल मुत्तलीब अब्दुल रफिक, सुशिला मधुकर मेढे, महेबूब रेहान अब्दुल मुत्तलीब, अय्युब खा भुरे खान, खाटीक सुरैयाबी मो. रशिद, इमरान खान इकबाल खान, शाहीन परवीन सबदर खान, अनिता मधुकर तायडे, शेख फरीदा बी शेख लुकमत, भावना भुषण पाटील यांना उमेदवारी देत काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याचा परिणाम राजकीय समीकरण ढवळून निघण्यावर होणार आहे. काँग्रेसमधील बंडखोरी ही स्थानिक विकासाला अडथळा ठरणारी आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित रणनीतीला हानी पोहोचवणारी ठरत असल्याने काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे अशी चर्चा पदाधिकाऱ्यामध्ये सुरु आहे. यानिवडणुकीत बंडखोरांना व महायुतीला मतदार त्यांची जागा दाखवतील असा विश्वास माजी आमदार शिरीष चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीनंतर व्यक्त केला.

krushisewak 
