ब्रेकिंग : रावेर मतदार संघासाठी राजकीय हालचाली गतिमान राष्ट्रवादीकडून उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव आघाडीवर ; आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा
कृषीसेवक न्यूज नेटवर्क
रावेर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे उमेदवारीबाबत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विद्यमान खासदार व भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याशी तुल्यबळ लढत देणारा उमेदवार देण्याचा विचार पक्षातर्फे सुरु आहे. कालपर्यंत उमेदवारीसाठी एड रवींद्र भैय्या पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी उद्योजक श्रीराम पाटील यांची उमेदवारीबाबत चर्चा झाली असून आता या पक्षाकडून उमेदवार म्हणून उद्योजक पाटील यांचे नाव पुढे आले आहे. आज मुंबईत पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
पक्षाकडून उमेदवारीबाबत चर्चा
रावेर मतदार संघात भाजपने पक्षाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देत या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तुल्यबळ लढत देणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करीत आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे अनेक जण इच्छुक होते. परंतु कालांतराने अनेक नावे मागे पडली आहेत. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार संतोष चौधरी व एड रवींद्र भैय्या पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यात महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पदाधिकाऱ्यांसह पुणे येथे शरद पवार व जयंत पाटील यांची भेट घेऊन रवींद्र पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे एड रवींद्र पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर राहिले होते. तर माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाव आपोआपच मागे पडले. मात्र येथील उद्योजक श्रीराम पाटील यांना पक्षाने उमेदवारीबाबत विचारणा केली असून श्री पाटील यांनी सोमवारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रत्यक्षात भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
आज बैठक : निर्णयाची शक्यता
आज बुधवारी प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नियुक्त पार्लिमेंटरी बोर्डाच्या सदस्यांची बैठक होत आहे. या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार गट)उद्योजक श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीवर चर्चा होऊन नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. श्रीराम पाटील हे रक्षा खडसे यांना तुल्यबळ उमेदवार ठरतील असा राजकीय जाणकारांनी अंदाज वर्तवला आहे. दरम्यान रावेर मतदार संघातून उमेदवार देण्याबाबत पक्षातर्फे राजकीय हालचाली वेगाने सुरु आहेत हे मात्र निश्चित.