रावेर मतदार संघ : ऍड रवींद्र भैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
बुधवारी पक्षाच्या बैठकीत निर्णय शक्य
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करीत आघाडी घेतली आहे. तर महविकास आघाडीतर्फे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला सोडण्यात आली आहे. या पक्षातर्फे ऍड रवींद्र भैय्या पाटील यांच्या नावावर पक्षाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत शिक्कमोर्तब होण्याची अधिक शक्यता आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्यात आलेल्या बहुतांशी जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र रावेरच्या जागेबाबत उमेदवारीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रावेर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी अनेकवेळा जाहीररीत्या बोलून दाखवली होती. मात्र भाजपकडून खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळताच श्री खडसे यांनी तब्बेतीचे कारण पुढे करीत या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यानंतर पक्षातर्फे खडसे यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नावाची शिफारस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे झालेल्या बैठकीत केली होती. मात्र रोहिणी खडसे यांनी आपण मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीपासून लांब राहणे पसंत केले.
उमेदवारीसाठी अनेक इच्छुक
पक्षातील यावलचे अतुल पाटील, जळगावचे रमेश पाटील, ऍड रवींद्र भैय्या पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, मुक्ताईनगरचे विनोद सोनवणे, माजी आमदार अरुण पाटील यांची नावे उमेदवारीच्या चर्चेत होती. मात्र त्यानंतर माजी आमदार संतोष चौधरी व ऍड रवींद्र भैय्या पाटील या दोघांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर आली. या दोघांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. व प्रचाराला सुरुवातही केलेली आहे. मात्र अद्याप उमेदवार म्हणून कोणाचेही नाव पक्षातर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.
उद्या होणार उमेदवाराचे नाव जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाची बैठक उद्या सकाळी अकरा वाजता पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नियुक्त केलेल्या पार्लीमेंटरी बोर्ड समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत होत आहे. या समितीत आमदार एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे यांच्यासह जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा सामावेश आहे. या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघातून या पक्षाचे उमेदवार म्हणून ऍड रवींद्र भैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार ऍड रवींद्र भैय्या पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे.