रक्षा खडसे पडल्या एकाकी : आता घरातूनच विरोध ; नणंद करणार जुना हिशोब चुकता

भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यापुढे आव्हाने संपता संपेनात

रक्षा खडसे पडल्या एकाकी : आता घरातूनच विरोध ; नणंद करणार जुना हिशोब चुकता

कृष्णा पाटील/ रावेर 

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. या पक्षाने रावेर लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली आहे. देशात मोदींचा करिष्मा चालणार असला तरी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंना हि निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. त्यांना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे. त्याशिवाय खडसे परिवाराचे कट्टर विरोधक असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची राजकीय खेळी अद्याप स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत रक्षा खडसे यांच्या विरोधात घरातूनच आता विरोधाचे शस्त्र उगारण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यापुढील आव्हाने संपता संपेनात अशी अवस्था सध्या त्यांची झाली आहे. घरातून होणाऱ्या विरोधाचा सामना त्यांना या निवडणुकीत करावा लागण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे यांचे सासरे व राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार यापूर्वीच जाहीर केला आहे.तर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष व रक्षा खडसेंच्या नणंद रोहिणी खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या दुसऱ्या पक्षात आहेत,मी माझ्या पक्षाचे काम करणार असे सांगत विरोधाचे हत्यार उपसले आहे. नणंदेचा घरातून होणाऱ्या विरोधाला मागील निवडणुकीतील पराभवाची किनार आहे अशी मतदार संघात चर्चा सुरु आहे. याचा जुना हिशोब यावेळी रोहिणी खडसे चुकता करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रक्षा खडसे यांना घरातून असलेला विरोध पाहता सध्या तरी त्या एकाकी पडल्याची स्थिती आहे.   

२०१४ व २०१९ अशा दोन वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांना आता होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली आहे. मात्र यामुळे भाजपमधील काही पदाधिकारी यामुळे नाराज आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात आले तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेले सर्व राजीनामे श्री महाजन यांनी नामंजूर केले आहेत. असे असले तरी खरेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली आहे का हा संशोधनाचा विषय आहे. हे भाजपला या भागातून मिळणाऱ्या मतदानावरच दिसून येईल. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची या निवडणुकीबाबत अद्याप भूमिका जाहीर नाही. ते २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने त्याचा फायदा पाटील यांना झाला होता. ते आता महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहेत. मात्र आगामी येणाऱ्या तसेच मागील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन आमदार पाटील यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. खडसे परिवार व पाटील यांच्यामधील वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

नाथाभाऊंचा सुनेला विरोध की राजकीय खेळी ?

तत्कालीन भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या प्रभावामुळे सून रक्षा खडसे यांना २०१४ व २०१९ अशा दोन वेळा उमेदवारी मिळाली होती. तसेच दोन्ही वेळी सुनेच्या विजयामागे नाथाभाऊंची मोठी शक्ती होती हे नाकारता येणार नाही. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. नाथाभाऊ आता राष्ट्रवादीत असून सून रक्षा खडसे भाजपमध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या मतदार संघातून विजयी करण्याची मोठी जबाबदारी पक्षश्रेठींनी त्यांच्यावर टाकलेली आहे. पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणार असल्याचा निर्वाळा नाथाभाऊ देत आहेत. त्यामुळे यामाध्यमातून रक्षा खडसेंना घरातून पहिला विरोध सासऱ्यांनी केला आहे. नाथाभाऊ खरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करतात कि सून रक्षा खडसेंचा विजयाचा मार्ग सोपा करतात हे लवकरच दिसून येईल. असे झाल्यास हि नाथाभाऊंची राजकीय खेळी ठरेल.   

नणंद जुने हिशोब चुकते करणार 

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथराव खडसे यांच्यासह संपूर्ण खडसे परिवार रक्षा खडसेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला होता. नणंद म्हणून मोठी जबाबदारी रोहिणी खडसे यांनी त्यावेळी पेलली होती. दोघं तान्हुल्यांना घरी ठेवून रोहिणी खडसे प्रचाराच्या मैदानात उतरल्या होत्या. गावोगावी मतदारांच्या भेटी घेऊन वाहिनी रक्षासाठी मतांचा जोगवा नणंदेने मागितल्याचे मतदारांनी पाहिलेले आहे. मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा निसटता पराभव झाला होता. हा पराभव का झाला याची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र ज्या भागात रक्षा खडसे यांना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले होते त्याच भागात रोहिणी खडसे यांची विधानसभा निवडणुकीत पीछेहाट दिसून आली होती. ही मतांची आकडेवारी सांगते. नाथाभाऊंनी भाजप सोडल्यावर रक्षा खडसे कायम भाजप सोबत राहिल्या. दूध संघाच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी भाजपचे काम केले. त्यावेळी सासू मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला. सध्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आहेत. तर भावजयी रक्षा खडसे भाजपच्या उमेदवार आहेत. रोहिणी खडसे यांनी पक्षाचे काम करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी मी माझ्या पक्षाचे काम करेल त्या (रक्षा) आता दुसऱ्या पक्षात आहेत असे म्हणत नणंद रोहिणी खडसे यांनी भावजयी रक्षा खडसेंविरूद्ध विरोधाचे शस्त्र उगारले आहे. रोहिणी खडसे यांनी पक्षाचे काम करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे रक्षा खडसेंना घरातून होणारा वाढता विरोध त्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. मागील निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने या पराभवाचा जुना हिशोब नणंद चुकता करण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे.