जागतिक जलदिन विशेष : स्व. भवरलाल जैन : भारतातील आधुनिक हरित क्रांतीचे प्रणेते
ठिबकमुळे झाली देशात दुसरी हरित क्रांती
कृष्णा पाटील / रावेर
शेती आणि शेतकऱ्यांचा विकास’ हे एकमेव ध्येय आयुष्यभर उराशी बाळगून जगलेले एक आधुनिक शेतकरी, द्रष्टे उद्योजक, असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून जळगावातील जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे नाव आदराने घेतले जाते. ठिबकच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आधुनिक हरित क्रांती निर्माण केली आहे. यामुळेच आज कोट्यवधी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. देशात सर्वप्रथम ठिबकची तंत्रज्ञान आणणारे व विकसित करणारे ते आधुनिक हरित क्रांतीचे प्रणेतेच ठरले आहे. अशा या शेतीतील योगी पुरुषाचे जागतिक जलदिनानिमित्त स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.
अमेरिकेतील फ्रेस्नो येथे १९८४ साली ते गेले असता त्यांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञान पाहिले. ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला होता. भवरलालजीनी इस्त्राईल प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट दिली. अभ्यास केला, तंत्रज्ञानाची पारख केली आणि आपल्या भारत भूमीला हे वरदान ठरेल अशी खूणगाठ मनाशी पक्की केली. भारतात परत येताना सोबत ठिबकची पुस्तके, माहितीपत्रके, नमुने (नळ्या, तोट्या इ.) यांची शिदोरी घेऊन आलेत. उद्योग समूहातील तांत्रिक सहकार्यांना याचा सखोल अभ्यास करायला लावला आणि १९८६ साली ऑस्ट्रेलियन कंपनी सोबत करार करून हे तंत्रज्ञान भारताच्या शेतीत प्रत्यक्ष उतरविले. त्यांनी फक्त हे ठिबक सिंचन आणलाच नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हे ठिबक वापरण्याबद्दल प्रवृत्त केलं. जैन इरिगेशनच्या या ठिबकमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती झाली. ठिबक सिंचनाच्या तंत्रज्ञानामुळे पिकाच्या उत्पादकतेत ४०% ते ५०% नी वाढ झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात आणि जगभरात ठिबक सिंचनात भवरलाल जैन यांचं नाव जाऊन पोहचलं. आज जगाच्या पाठीवर अनेक देशात जैन इरिगेशनचे ठिबक संच निर्मितीचे कारखाने कार्यरत आहेत तर सुमारे १२३ देशांमध्ये त्यांची उत्पादने विकली जातात.
विशेषतः आफ्रिका खंडात त्यांचा मोठा पसारा वाढला आहे. तिथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जैन इरिगेशन पाईप्स हमखास पाहायला मिळतात. रवांडासारखा देश जैन इरिगेशन सोबत हजारो कोटींचे करार करतो. संपूर्ण आफ्रिका खंडात सर्वात मोठ्या शेतीपयोगी कंपनी म्हणून जळगावच्या जैन इरिगेशनचे नाव घेतले जाते.ठिबक सिंचनानंतर शेतकऱ्यांसाठी भवरलाल जैन यांनी जैव तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगशाळा उभारली. तसेच त्यांनी ऊती संवर्धनाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानही विकसित केले. केळीच्या रोपांचे ऊती संवर्धन लोकप्रिय करण्यासोबतच डाळिंब व कांद्याच्या रोपांच्या ऊती संवर्धनाची संकल्पना जैन यांनी रुजवली. पुढे जैन यांनी जळगाव येथे अन्न प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामध्ये त्यांनी भाजीपाला व कांदा, लसूण, आले आदींचे निर्जलीकरण करण्यात यश मिळवले.