गहुखेडा येथे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविणार
नागरिकांनी घेतला निर्णय
योगेंद्र भालेराव /गहुखेडा
गहुखेडा ता. रावेर येथे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता कमिटीची बैठकीत ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला. तसेच प्रत्येक गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी असे आवाहन त्यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.
गहुखेडासह परिसरातील गावांमध्ये होऊ घातलेल्या गणेशोत्सव सणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी व कायद्याच्या चौकटीत राहून समाज प्रबोधनवर भर द्यावा असेही आवाहन एपीआय पळे यांनी यावेळी केले. तसेच युवकांनी व्यसनापासून दूर राहून सामाजिक एकोप्याने सण साजरे करून पारंपारिक पद्धती व सामाजिक सलोखा जोपासावा असे सांगितले.कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
या वेळी गहुखेड़ा येथील दोन्ही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सहमतीने एक गाव एक गणपती बसविण्याचे ठरविले.या वेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष आकाश चौधरी व सोपान कोळी यांचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी एपीआय पळे यांच्याकडून मंडळास ११०० रुपये देणगी देण्यात आली. शिवाजी पाटील यांनी गणपती मंडळाला ५००० रुपये वर्गणी जाहीर केली. याप्रसंगी पोलीस कर्मचारी विजय पोहेकर, श्री.कुरकुरे, गहूखेडा पोलिस पाटील सौ.मंदाताई पाटील, रायपूरचे पोलिस पाटील प्रदीप चौधरी, सुदगावचे पोलिस पाटील मनिष अनूसे, सुधाकर कोळी, संदेश कोळी,भीम आर्मी अध्यक्ष राहुल भालेराव, शिवाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर तायडे, मयूर चौधरी, निखिल भालेराव तसेच मोठ्या संख्येने गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.