खूनाचा तपास थंडावला : महिना उलटूनही पोलिसांना महिलेच्या खूनाचा धागा गवसेना

तपासासाठी गेलेले पथक रिकाम्या हाती माघारी

खूनाचा तपास थंडावला : महिना उलटूनही पोलिसांना महिलेच्या खूनाचा धागा गवसेना

प्रतिनिधी/रावेर  

महिनाभरापूर्वी २४ जुलैला निंभोरासीम ता. रावेर गावाजवळ तापी नदीपात्रात एका ३० ते ३५ वर्षाच्या महिलेचा दोरीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगताना आढळून आला होता. या महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करीत खूनाचा गुन्हा निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी येवून तपास सुरु केला होता. या घटनेला आज एक महिना उलटूनही अद्यापतरी पोलिसांना या खूनाचा तपास लावता आलेला नाही. महिनाभर तपास करूनही महिलेच्या अज्ञात मारेकऱ्यापर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत. यावरून निंभोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

२४ जुलैला पहाटे निंभोरासीम गावाजवळ नदीपात्रात हातपाय बांधून व गळा आवळून खून करून महिलेचा मृतदेह फेकलेला असावा असा संशय घटनेनंतर निंभोरा पोलिसांनी व्यक्त केला होता. सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीने तपासचक्रे फिरवली. तपासाच्या दृष्टीने पोलिसांचे पथक तयार केले. या पथकांनी रावेर तालुक्यासह शेजारील तालुके तसेच बुलढाणा, बऱ्हाणपूर, खरगोन, सेंधवा जिल्ह्यात शोध घेतला मात्र अद्यापही पोलिसांना या खूनाचा धागा गवसलेला नाही. या घटनेला तब्बल एक महिना उलटला असून आता हा तपास थंडावला आहे असेच जाणवते. सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांना महिनाभरापूर्वी घडलेल्या खूनाचा तपास करता आलेला नाही यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत आता नागरिकात चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांना याबाबत विचारले असता  आजूबाजूच्या तालुक्यात व सीमेवरील मध्यप्रदेशातील भागात तपास करण्यात आला आहे. तपास सुरु आहे एवढेच उत्तर मिळाले. सदर महिला कोण? ती कुठून आली? तिचा खून कुणी व नेमका कशासाठी केला? या प्रश्नांची उत्तरे आरोपी जेरबंद झाल्याशिवाय पोलिसांना मिळणार नाहीत  

अवैध धंद्यांना लगाम कोण लावणार ?

एकीकडे महिना उलटूनही महिलेचा खूनाचा तपास लागत नसताना त्याचवेळी दुसरीकडे निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात मोठ्या प्रमाणावर सट्टापत्ता, जुगाराचे अड्डे, देशीविदेशी दारूची अवैधरीत्या विक्री, गावठी हातभट्टीची दारू, असे अवैध धंदे राजरोसपणे खुलेआम सुरु आहेत. निंभोरा पोलिसांचे काही कर्मचारी रावेर-सावदा रस्त्यावर चालणाऱ्या अवैध प्रवाशी वाहतुकीद्वारे दरमहा विशिष्ट तारखेला हप्ता जमा करतात असे काही प्रवाशी चालक खासगीत सांगतात. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेती शिवारात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केबल, स्टार्टर, पीव्हीसी पाईप ठिबक नळ्या चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. एपीआय श्री बोचरे यांनी निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांना लगाम लावण्याची गरज आहे. तसेच शेती साहित्याच्या चोऱ्या करणाऱ्या भुरट्या चोरांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.