आमदार अमोल जावळे यांची तंबी : घरकुल योजनेत पैशांसाठी अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही : रावेरला पंचायत समितीत घरकुल मंजुरीच्या पत्रांचे वितरण
शौचालय घोटाळ्यामुळे लागलेला डाग पुसावा : नंदकिशोर महाजन

प्रतिनिधी / रावेर
घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक करीत त्यांच्याकडून पैसे मागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याची आपण गय करणार नाही, माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही अशी तंबी आमदार अमोल जावळे यांनी रावेर पंचायत समितीत आयोजित लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या मंजुरीचे पत्र वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना दिली.
राज्यात २० लाख घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीच्या पत्राचे वितरण आज करण्यात आले. त्या अनुषंगाने रावेर पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, शिवसेनेचे वय व्ही पाटील, राजन लासूरकर, सी एस पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती पी के महाजन, गट विकास अधिकारी के पी वानखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ३० लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या पत्रांचे वितरण करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोहचविण्याचा प्रयत्न करावा. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लाभार्थ्याना कर्मचारी पैशाची मागणी करतात. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पैशासाठी अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय करणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार जावळे यांनी दिला. तसेच शासकीय कामासोबत गोरगरिबांची यामाध्यमातून सेवा करावी असे भावनिक आवाहनश्री जावळे यांनी केले.
काळा डाग पुसण्याचा प्रयत्न करा : नंदकिशोर महाजन
रावेर पंचायत समितीला मागील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे शौचालय घोटाळ्यामुळे काळा डाग लागला आहे. पंचायत समितीला लागलेला हा डाग उत्कृष्ट कामाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी पुसण्याचा प्रयत्न करावा असे मत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केले. यावेळी बिडीओ के पी वानखेडे यांनी घरकुल योजनेचा आढावा सादर केला तसेच तक्रारी येणार नसल्याचे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र फेगडे, ग्राम विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.