सहकार क्षेत्राशिवाय शेतकऱ्यांची प्रगती अशक्य : माजी आमदार अरूण पाटील यांचे मत

रावेर तालुका खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

सहकार क्षेत्राशिवाय शेतकऱ्यांची प्रगती अशक्य : माजी आमदार अरूण पाटील यांचे मत
प्रतिनिधी / रावेर
देशाच्या अर्थव्यवस्थेचे खरे आधारस्तंभ शेतकरी आहेत. मात्र शेतकऱ्यांची आजची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झाली आहे. शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हायची असेल तर ती सहकार क्षेत्राशिवाय शक्य नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेवून सहकारी संस्थांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे असे मत माजी आमदार अरूण पाटील यांनी व्यक्त केले. 
रावेर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी आमदार अरूण पाटील यांच्या शेतकरी पॅनलला घवघवीत यश मिळाल्यानंतर नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना माजी आमदार श्री पाटील बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेनेचे (उबाठा गट) जिल्हा उप प्रमुख योगिराज पाटील, काँग्रसचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, एस आर चौधरी, यशवंत धनके उपस्थित होते. 
माजी आमदार श्री पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, सहकार क्षेत्र हे ग्रामीण जनतेचा व शेतकरी वर्गाचा पाया आहे. मात्र शासनाच्या बदलत्या धोरणामुळे सहकार क्षेत्राची पिछेहाट सुरू आहे. सहकार क्षेत्र जिवंत ठेवल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे अशक्य आहे. रावेर तालुका खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालकांनी सर्वांना विश्वासात घेऊन संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना राबवाव्यात. संघाने शेतकरी हितासाठी भविष्यात काम केल्यास रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीला हातभार लागेल. त्याचप्रमाणे या माध्यमातून विविध लघु उद्योगासह प्रक्रिया उद्योग राबवावे अशी अपेक्षा माजी आमदार अरूण पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, विलास चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक नीलकंठ चौधरी, निलेश चौधरी, जिजाबराव चौधरी, बिसन सपकाळ, सीताराम महाजन, लक्ष्मण मोपारी, नितीन पाटील, यशवंत महाजन, ज्ञानेश्वर धनगर, पुरुषोत्तम पाटील, यांच्यासह वाय व्ही पाटील, तुषार मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी तर आभार मंदार पाटील यांनी मानले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.