अपेडाच्या माध्यमातून केळी निर्यातीसाठी प्रयत्न : रावेर बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल यांचे आश्वासन
तीन महिन्यात केळी महामंडळ स्थापन होण्याची शक्यता
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
केळीला अधिक भाव मिळावा यासाठी अपेडाच्या माध्यमातून केळी निर्यातीसाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील. तसेच केळी विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्णत्वास येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीचे आयोजन बाजार समितीतफे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बंडू कापसे, अप्पर तहसीलदार मयूर कळसे, सहाय्यक निबंधक विजयसिंह गवळी उपस्थित होते.
केळी भाव व शेतकऱ्यांच्या समस्या यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील १२५० शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम अद्याप मिळलेली नाही ती त्वरित मिळावी तसेच रावेरला केळी संशोधन उपकेंद्र व्हावे अशी मागणी सुनील कोंडे यांनी केली. सीएमव्ही रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याच्या धर्तीवर लाभ मिळावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी केली. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर शालेय पोषण आहारात केळीचा समावेशाची मागणी सभापती सचिन पाटील यांनी केली. यावेळी संचालक डॉ राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, पितांबर पाटील, जयेश कुयटे, हरीश गणवाणी, रफिक शेख , रामदास पाटील यांनी समस्या मांडल्या. बैठकीला संचालक गणेश महाजन, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, सय्यद असगर, प्रल्हाद पाटील, रोहित अग्रवाल , सचिव गोपाळ महाजन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
केळी भावाबाबत निर्माण होणाऱ्या समस्येवर बऱ्हाणपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व बाजार समितीशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. खानापूर येथील टोल नाक्यावर शेतकऱ्यांच्या वाहनांना पुन्हा पुन्हा टोल भरावा लागतो. त्याबाबत दोन दिवसात मार्ग काढू तात्काळ सुटणाऱ्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचे उर्वरित प्रश्न टप्याटप्य्याने सोडवले जातील असे आश्वासन जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिले.