निमित्त नुकसानीच्या पाहणीचे ; मिशन काळ्या बाजारातील धान्याच्या कारवाईचे
स्थानिक प्रशासनाला गाफील ठेवत जिल्हाधिकाऱ्यांचा छापा
रावेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याचे निमित्त पुढे करीत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी तालुक्याचा दौरा केला. मात्र याचवेळी स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना गाफील ठेवत त्यांनी दोन गोडावूनवर छापा टाकून कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईने महसूल विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा मात्र पुरता गोंधळ उडाला आहे.
सोमवारी व मंगळवारी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे सुमारे दहा कोटींचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील १५ गावातील केळी बागा आडव्या झाल्या आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तालुक्यात येत असल्याची माहिती स्थानीक प्रशासनाला जिल्हा स्तरावरून देण्यात आली होती. दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कळमोदा शिवारातील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी करीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते येथील तहसील कार्यालयात आले. मात्र काही मिनिटातच त्यांनी स्थानीक प्रशासनाला न सांगता सरळ मोर्चा बऱ्हाणपूर रस्त्यावरील चौधरी ट्रेडर्स या गोदामावर नेला. गोदामाची तपासणी केली असता त्यांना या ठिकाणी गहू व तांदूळ मोठया प्रमाणावर आढळून आला. हे धान्य राशनचे असल्याचा जिल्हाधिकारी मित्तल यांना संशय आल्याने त्यांनी हे गोडावून सिल केले. तर तेथेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रेहान शेख यांच्या गोडावूनची झडती घेतली असता तेथे संशयास्पद गहू व तांदूळ कट्टे आढळून आले. मित्तल यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग व तहसिलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पवित्र्यामुळे स्थानीक प्रशासनाची पुरती नाचक्की झाली आहे. गोडावून तपासणीची साधी कुणकुणही मित्तल यांनी प्रांताधिकारी, तहसिलदार व पुरवठा विभागाला लागू दिली नाही हे विशेष. २०१९ मध्ये जिल्हा पुरवठा विभागाने शहरातील याच गोडावूनवर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी मात्र या प्रकरणी पुरवठा विभागाने गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले नाही.
काळ्या बाजारापासून प्रशासन अनभिज्ञ कसे ?
रावेर तालुक्यात राशन दुकानातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या धान्याचा मोठया प्रमाणावर काही सराईतांकडून काळाबाजार केला जातो. रावेर यावल तालुक्यात हा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे जनतेमध्ये उघडपणे बोलले जाते. याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मिळाल्यावर त्यांनी स्थानीक प्रशासनाला गाफील ठेवत कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानीक प्रशासनाची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे. महसूल विभागाची प्रतिमा व प्रतिष्ठा या कारवाईमुळे खालावली आहे. ७० किलोमीटरवर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना रावेरमधील गोडावूनमध्ये असलेल्या संशयास्पद धान्याची माहिती मिळते तर मग स्थानिक प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही. का स्थानिक प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे. पुरवठा विभाग नेमका करतो तरी काय ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. स्थानीक प्रशासनाला याची माहिती नसावी ही सर्व सामान्यांना न पटणारी बाब आहे.
मिडीयाला लांब ठेवण्याचा प्रयत्न
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील दोन गोडावूनवर छापा टाकून गोडावून सील करण्याची कारवाई केल्याची वार्ता शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. याबाबत तहसिलदार बंडू कापसे व पुरवठा अधिकारी डी के पाटील यांच्याशी स्थानिक पत्रकार माहिती घेण्यासाठी वारंवार संपर्क साधत होते. मात्र तहसिलदार कापसे कॉल रिसिव्ह करत नव्हते तर पुरवठा अधिकारी पाटील यांनी त्यांचा मोबाईल बंद केलेला होता. या घटनेपासून मिडीयाला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. अखेर रात्री आठ वाजेपर्यंत चर्चेच्या सर्व फेऱ्या निष्फळ ठरल्या. या घटनेची अधिकृत माहिती घेण्यासाठी संबधीत अधिकाऱ्यांशी पत्रकारांतर्फे सतत संपर्क साधला जात असल्याने अखेर रात्री उशिरा महसूल प्रशासनाला माहिती देणे भाग पडले. गोडावून सील करण्याच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी दुपारी जळगावला निघून गेले. असे असताना रात्री उशिरापर्यंत कोणत्या बाबींवर चर्चा सुरु होती याचा मात्र थांगपत्ता समजू शकला नाही.