पित्याच्या स्मृतीनिमित्त शेतकऱ्यांना बेलाचे रोपटे व कृषी दैनंदिनीचे वाटप : उत्तर कार्याचा खर्च टाळून साधला त्रिवेणी संगम
चोपड्याचे डॉ नरेंद्र पाटील दांपत्याचा स्मृती जोपासण्याचा अनोखा उपक्रम
चोपडा / प्रतिनिधी
तांदळवाडी (ता चोपडा) येथील रहिवाशी असलेल्या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ नरेंद्र पाटील व डॉ वैशाली पाटील या दांपत्याने पित्याच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. उत्तर कार्यावेळी होणारा अनावश्यक खर्च टाळून उपस्थित असलेल्या नातेवाईक मित्रमंडळी व आप्तेष्टाना त्यांनी बेलाच्या वृक्षाचे रोपटे व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी दैनंदिनी मार्गदर्शिकेचे वाटप केले आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
स्मृती जोपासण्यासाठी अनोखा उपक्रम तांदळवाडी येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर आनंदराव पाटील (आप्पा) यांचे नुकतेच निधन झाले. सहा भाऊ व दोन बहिणी असा पाटील यांचा मोठा परिवार आहे. पाटील परिवाराची शेतीशी नाळ जुळलेली असून खंडवा येथील धुनिवाले दादाजी यांचा भक्त म्हणून पाटील परिवार गणला जातो. प्रभाकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र भूलतज्ञ डॉ. नरेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी डॉ. सौ वैशाली पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. उच्च विद्याविभूषित डॉक्टर दांपत्याने पित्याच्या स्मृती जतन करण्यासाठी पर्यावरणाचा संदेश देत तेरवीच्या दिवशी (पितृश्राद्ध वेळी) श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथासोबतच महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शेतकऱ्यांना मार्गदर्शक असलेली कृषिदर्शनी ही पुस्तिका भेट दिली. तसेच बेल वृक्षाच्या रोपांचे वाटप केले.पाटील परिवाराने भागवत गीता , कृषिदर्शनी, बेल वृक्षाचे रोपटे वाटप करीत एकाचवेळी अध्यात्म, शेती व पर्यावरणाचे रक्षण यांचा सुवर्ण संगम साधला आहे. प्रथा परंपरेसोबत आधुनिकतेचा मिलाप केला आहे. बेल वृक्षांच्या रुपात वडील प्रभाकर पाटील यांच्या स्मृती कायम राहतील. पाटील परिवाराच्या या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांशी बांधिलकी
शेतकऱ्यांना पिकांची माहिती मिळावी, शेतीतील तंत्रज्ञान अवगत व्हावे , लागवड तंत्रज्ञान, पीकसंरक्षण, जलसंधारण, कृषी-प्रक्रिया, पशुधनाची निगा, कृषी अर्थशास्त्र यासारख्या शेती उपयुक्त परिपूर्ण माहितीचा समावेश महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषीदर्शनीमध्ये असतो. हि माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न डॉ पाटील दाम्पत्याने या निमित्ताने केला आहे. शेतकरी कुटुंबाची शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी पाटील परिवाराने जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी विद्यापीठाची कृषीदर्शनी म्हणजे "शेतीची भगवद्गीताच" म्हणावी.
साधला अध्यात्म व पर्यावरण रक्षणाचा संगम
तसेचस्व. प्रभाकर पाटील यांचा संपूर्ण परिवार हा श्री दादाजी धुनिवाले यांचा निस्सीम भक्त आहेत. श्री दादाजी हे साक्षात भगवान शंकराचे अवतार मानले जातात. त्यामुळे पाटील परिवाराने वडिलांच्या उत्तर कार्याच्या दिनी (तेराव्याला) भगवान शंकराला प्रिय असलेले बेलाच्या झाडाच्या रोपांचे वाटप केले आहे. यातून त्यांनी अध्यात्म आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा सुवर्णसंगम साधला आहे. वाटप केलेल्या या बेल वृक्षाची जोपासना प्रत्येकजण काळजीपूर्वक करेल व या बहरलेल्या बेल वृक्षाच्या रूपाने स्व प्रभाकर पाटील यांच्या स्मृतींना उजाळा मिळत राहील. .
माझ्या कुटुंबीयांची शेतीवर तसेच श्री दादाजी धुनीवाले यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार आमच्या संपूर्ण कुटुंबीयांची वाटचाल सुरु आहे. समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून व वडिलांच्या स्मृती चिरंतन स्मरणात राहाव्यात यासाठी बेलाचे रोपटे व कृषी दैनंदिनी भेट दिल्या आहेत.
--डॉ नरेंद्र पाटील भूलतज्ज्ञ चोपडा