क्षमतेपेक्षा जास्त आवाज ठेवणाऱ्या डीजे चालकांवर होणार कारवाई : एसपी डॉ महेश्वर रेड्डी यांचा इशारा
रावेरला पोलीस ठाण्यातर्फे शांतता समितीची बैठक

प्रतिनिधी / रावेर
गणेशोत्सव काळात शासनाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन कोणीही करू नये. क्षमतेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.
रावेर पोलीस ठाण्यातर्फे गणेशोत्सव व ईद च्या प्रश्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, तहसीलदार बी ए कापसे, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, नगर पालिकेचे प्रतिनिधी प्रशांत कोकाटे, युवराज गोयल, वीज वितरण कंपनीचे अभियंता ठाकरे, आदी उपस्थित होते. एसपी डॉ महेश्वर रेड्डी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, सर्व समाजाच्या लोकांनी सण उत्सव एकोप्याने साजरे करावेत. मिरवणुकीत गुलाल ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा, अवास्तव खर्च वाढवण्यापेक्षा श्रद्धा वाढवावी असा संदेशही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. मिरवणूक मार्ग दुरुस्त करावेत, शहरातील स्वच्छतेकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे, उत्सव काळात विजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी नागरिकांनी केल्या.
संवाद सहकार्याच्या बळावर एकोपा : डॉ संदीप पाटील,
कोणताही उत्सव सण हे मानवाला आनंद देणारे असतात. परस्परांशी असलेला संवाद व सहकार्य असल्याने निर्माण होणाऱ्या तक्रारीचे आपोआपच निवारण होते. व यातूनच जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. सर्वांनी परस्परांशी समन्वय राखून काम केल्यास एकोपा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉ संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना केला.
नियमांचे पालन करा : डीवायएसपी बडगुजर
शासनाने उत्सवासाठी घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन केल्यास आनंद द्विगुणित करता येईल. कोणताही सण, उत्सव ऐकतेचा संदेश देतो. सकारात्मक विचार करून सर्वांनी उत्सव काळात एकत्र आले पाहिजे असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी केले. यावेळी ई जे महाजन, दिलीप कांबळे, डॉ संदीप पाटील, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील सी एस पाटील, युसूफ शेख, नितीन पाटील, योगेश गजरे, पंकज वाघ, गयास शेख यांच्या सह शांतता कमिटी सदस्य, दक्षता समिती सदस्य व पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तविक पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी केले. सूत्रसंचालन एपीआय मनोज महाजन यांनी केले. यावेळी एपीआय मीरा देशमुख पीएसआय तुषार पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.