रावेर तालुक्यात राजकीय भूकंप : एकनाथराव खडसेंना धक्का : रावेर तालुक्यातील सुमारे २०० कार्यकर्त्यांचा आज मुंबईत अजित पवार गटात प्रवेश

खासगी वाहनाने कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

रावेर तालुक्यात राजकीय भूकंप : एकनाथराव खडसेंना धक्का : रावेर तालुक्यातील सुमारे २०० कार्यकर्त्यांचा आज मुंबईत अजित पवार गटात प्रवेश

कृषिसेवक न्यूज नेटवर्क/रावेर

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे या पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. मात्र आतापर्यंत शरद पवार यांच्या गटात तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत होते. परंतु तालुक्यातील राष्ट्रवादी गटात आता फूट पडली असून माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोनशे कार्यकर्ते आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रावेर तालुक्यात राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही.कालपर्यंत माजी मंत्री एकनाथ खडसेंसोबत असलेले रमेश पाटील यांनी आज अजित पवार गटात प्रवेशाचा मार्ग पत्करला आहे. हा खडसेंना एक मोठा धक्का समजला जातो.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उप सभापती योगेश पाटील, संचालक गणेश महाजन, संचालक जयेश कूयटे यांच्यासह विविध गावांचे सरपंच व पदाधिकारी, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोडून आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी सहा वाजता होत आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी आम्ही सभापती सचिन पाटील यांच्या सोबत असल्याचे पत्र दिले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत तालुक्यात फूट पडली असून आतापर्यंत तालुक्यात अजित पवार गटाचे अस्तित्व नव्हते. मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. रमेश पाटील व कार्यकर्ते सुमारे दहा खासगी वाहनाने सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

उद्योजकही अजित पवार यांच्या संपर्कात 

रावेर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले तालुक्यातील एक उद्योजक अजित पवार गटाकडून उमेदवारी घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मंगळवारी त्यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे. त्यांच्या या गटात अजित पवार यांच्या उपस्थितीत जळगावात लवकरच कार्यकर्त्यांसह प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वातावरणात गारवा असला तरी बदलत्या राजकीय परिस्थतीमुळे राजकीय आखाडा तापायला सुरूवात झाली आहे.