आमदार अमोल जावळे नुकसानीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर : यावल तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी : नुकसानीचे पंचनामे सुरु

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील : जावळे

आमदार अमोल जावळे नुकसानीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर : यावल तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी : नुकसानीचे पंचनामे सुरु

प्रतिनिधी I रावेर 

 रावेर विधानसभा मतदार संघात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीच्चीया  पाहणीसाठी आमदार अमोल जावळे तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. नुकसानीची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. केवळ पाहणीची औपचारिकता न दाखवता थेट प्रशासनातील जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सोबत घेत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दाखवून दिले. यावेळी त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांसोबत यावल तालुक्यातील भालोद, बामणोद, आमोदा, म्हैसवाडी, राजोरा, बोरावल आणि परिसरातील शेतशिवारांना भेट दिली. यावेळी नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची सूचना आमदार जावळे यांनी केली.

 पाहणीवेळी आमदार जावळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नुकसान भरपाईसाठी पंचनामे व तत्सम कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी सूचना केली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे केळी, हरभरा, गहू, तूर, पपई या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  याप्रसंगी यावल प्रभारी तहसीलदार संतोष विनंते, कृषी अधिकारी भरत वारे, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, बामणोद मंडळ अधिकारी बबीता चौधरी, अंजाळे मंडळ अधिकारी रशिद तडवी, भागातील तलाठी आणि शेतकरी उपस्थित होते.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.

----अमोल जावळे, आमदार रावेर