दिलासा : रावेरसाठी ४२ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी : आगामी २५ वर्षांचा पाणी प्रश्न मिटणार
माजी नगरसेवक पद्माकर महाजन यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी/ रावेर
रावेर शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येथील नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठवली होती. या विभागाने योजनेला तांत्रिक मान्यता दिल्यावर सोमवारी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने या योजनेसाठी ४२ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान (२.०) दुसरा टप्पा प्रशासकीय मान्यता दिली आहे.
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन आगामी २५ वर्षांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. भविष्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तापी नदीवरून शहरासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ४२ कोटी ७५ लाख रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी नाशिकच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेली होती. या योजनेला तांत्रिक मान्यता मिळून प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर सोमवारी नगर विकास विभागाने या योजनेच्या ४२ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रलंबित असलेल्या या योजनेसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे या योजनेला मान्यता देण्याची मागणी केली होती. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे श्री जावळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.