निर्धार : जैन इरिगेशनचे वर्षभरात १ हजार कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट : अनिल जैन
जैन इरिगेशनच्या सर्वसाधारण सभेत निर्धार
प्रतिनिधी / जळगाव
जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये निर्यात करीत जैन इरिगेशन कंपनीने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक शिट व सौलर विभागातून सकारात्मक दृष्टीने वाटचाल करत भविष्यात १,००० कोटींचे निर्यातीचे उद्दिष्टे कंपनीचे आहे. देशातील १४ कोटी शेतकऱ्यांपैकी एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत कंपनी पोहचली असून गुणवत्ता व विक्री पश्चात सेवेच्या बळावर कंपनीने विश्वास संपादन केला आहे. शेती व शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगातील शेतीतील सर्वोत्तम तंत्रज्ञान अल्पभुधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सांगितले.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या प्रशासकीय इमारतीत अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी अनिल जैन यांनी भागधारक, सहकारी यांच्याशी संवाद साधला. व्यासपीठावर कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, कंपनी सचिव अवधुत घोडगावकर, लेखापरिक्षक नविंद्रकुमार सुराणा, जैन फार्मफ्रेश फुडूस लि. चे संचालक अथांग जैन, अभंग जैन होते. सभेवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, नरेंद्र जाधव, सतिशचंद मेहता उपस्थित होते. स्क्रृटीनायझर अमृता नौटीयाल यांच्या उपस्थितीत ई-वोटिंग झाले. सुरवातीला वर्षभरात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत कंपनीच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल, तांत्रिक नवकल्पना, भविष्यातील विक्री गुंतवणूक धोरणे, तसेच सहव्यवस्थापकिय संचालकपदी अतुल जैन व डॉ. नरेंद्र जाधव यांची स्वतंत्र संचालकपदी पुनर्नियुक्तीसह ऑडिटर निर्णयांचा समावेश असे एकूण सात विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले होते.
‘जैन क्लायमेंट स्मार्ट सोल्युशन’ प्रभावी
या सभेत व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष अनिल जैन यांनी शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या उपयोगावर प्रकाश टाकला. यांनी सांगितले की, एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, पीक पद्धतीतील सुधारणा, तसेच योग्य वेळी हार्वेस्टिंगचे मार्गदर्शन मिळू शकते. ज्यामुळे उत्पादनात व आर्थिक लाभात मोठी वाढ होऊ शकते. ‘क्लायमेंट चेंज’ हवामान बदलाचा शेतीवर होत असलेल्या दुष्परिणामांमुळे शेतकऱ्यांना नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी नेट हाऊस, पॉलीहाऊस, एरोपोनिक, हायट्रोपोनिक फार्मिंग, फ्युचर फार्मिंग सारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. यासाठी ‘जैन क्लायमेंट स्मार्ट सोल्युशन’ हे तंत्रज्ञान प्रभावी ठरणार आहे.
जीएसटी कपातीमुळे दिलासा
नव्याने बदल झालेल्या जीएसटी पॉलिसीमुळे ड्रीप, स्प्रिंकलर, सौलर कृषी पंम्प यांच्या किंमतीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्याचा वापर अतिरीक्त तंत्रज्ञान स्विकारण्यास मदत होईल. कंपनीने शेतीत नवोन्मेष व तंत्रज्ञानास साहाय्य देणे, शेतकऱ्यांचे हित जपणे, आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार केला आहे. बदलत्या वातावरण परिस्थितीला उत्तर देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अनिल जैन यांनी केले.
यावर्षी केळीची ४००० कोटी रूपयांची निर्यात झाली आहे. त्यात जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून विकसीत झालेल्या गुणवत्तापूर्ण केळीला जगात प्राधान्य आहे. विदेशातील मागणी पाहता टिश्यूकल्चर रोपांची मागणी वाढत आहे त्यामुळेच टिश्यूकल्चर विभागाच्या विस्तारीकरणावर भर दिला जाणार आहे, असे सूतोवाचही अनिल जैन यांनी केले. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.
सहकाऱ्यांतर्फे अशोक जैन यांचा सत्कार

krushisewak 
