ग्रामविस्तार अधिकाऱ्याकडून ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न : उटखेडा ग्रामपंचायतीची चौकशी संशयाच्या भोवऱ्यात
चौकशी अधिकारी पाटणकर यांच्याविरुद्ध आयुक्तांकडे तक्रार
प्रतिनिधी/रावेर
तालुक्यातील उटखेडा येथील ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून साहित्याची खरेदी ही शासनाच्या जीएम पोर्टलवरून करणे बंधनकारक असताना ग्रामपंचायतीने या नियमाला हरताळ फासला आहे. या खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने गट विकास अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ग्रामविस्तार अधिकारी उमेश पाटणकर यांनी पारदर्शक चौकशी न करता गैरव्यवहार करणाऱ्यांची पाठराखण केली आहे. यासाठी झालेल्या आर्थिक तडजोडीतून पाटणकर यांनी हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चौकशी अधिकारी पाटणकर यांच्याविरुद्ध ग्रामविकास सचिव व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१५ वा वित्त आयोगातून साहित्याची खरेदी करतांना ती शासनाच्या जीएम पोर्टलवरून खरेदी करणे आवशक आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी संगनमताने या नियमाला डावलून बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी केली आहे. याबाबत तक्रार करण्यात आल्यावर ग्रामविस्तार अधिकारी उमेश पाटणकर यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र श्री पाटणकर यांनी या प्रकरणाची केलेली चौकशी संशयास्पद असून गैरव्यवहार करणाऱ्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पाटणकर यांना “खुश” करण्यात आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. आर्थिक गैरव्यवहार झालेला असताना हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न चौकशी अधिकारी पाटणकर यांनी केला आहे. त्यामुळे श्री पाटणकर यांच्याविरुद्ध राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव व विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हास्तरावरून चौकशी करावी व कर्तव्यात कसूर करणाऱ्या चौकशी अधिकारी उमेश पाटणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तक्रारदार कृष्णा पाटील यांनी केली आहे.

krushisewak 
