चोपडयात कृषी विक्रेते आक्रमक : कृषी कायद्याच्या विरोधासाठी उद्यापासून तीन दिवस कृषी केंद्रे बंद
कृषी केंद्र चालक संघटनेतर्फे पालकमंत्र्यांना दिले निवेदन
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/चोपडा
राज्य सरकारने प्रचलित कृषी कायद्यात दुरुस्ती करून नवीन कायदे तयार करणेची प्रक्रिया सुरु केली आहे. नवीन कायद्यातील तरतूदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक असल्याने कृषी उत्पादनांची विक्रीचा व्यवसाय करणे अशक्य होणार आहे. लागू होणाऱ्या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी उद्यापासून (२ ते ४ नोव्हेंबर) तीन दिवस चोपडा तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा केंदे बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रास्ताविक कायदे रद्द करणेसाठी चोपड्यात कृषी निविष्ठा धारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
बोगस बी-बियाणे, रासायनिक खते विक्रीला पायबंद घालण्यासाठी पावसाळी अधिवेशनात प्रचलित कृषी कायद्यात दुरुस्ती करून नवीन कायदे करण्याची सरकारने घोषणा केली होती. त्याप्रमाणे प्रस्तावित विधेयक तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विक्रेत्यांना एमपीडीए कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृषी विक्रेते कृषी विभागाच्या मान्यता प्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठा सीलबंद पॅकींगमध्ये खरेदी करुन त्या शेतकऱ्यांना सीलबंद पॅकींगमध्य विक्री करतात.असे असताना बनावट निविष्ठा प्रकरणी कृषी केंद्र चालकांना वेठीस धरले जात आहे. या संदर्भात चोपडा तालुका फर्टिलायझर,पेस्टिसाईड् व सिड्स संघटनेचे अध्यक्ष नेमीचंद जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदनाद्वारे प्रस्तावित कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव दिलीप पाटील, डोंगर पाटील, प्रदीप अग्रवाल, नितीन पाटील, नितीन जैन, अशोक पाटील, नितीन माळी, मिलिंद निकम, नितीन चौधरी, विवेक पाटील, प्रवीण बडगुजर, राहुल धनगर, जीवन जैन यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.