अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करा : जनतेच्या तक्रारीचे तात्काळ निराकारण करा: आमदार अमोल जावळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
रावेर मतदारसंघातील सर्व विभागांची आढावा बैठक
प्रतिनिधी/ यावल
रावेर मतदारसंघातील विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयचाअभाव असल्याने नागरिकांना कार्यालयच्या फेऱ्या माराव्या लागतात. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्परांशी समन्वय राखून काम करावे अशा सूचना आमदार अमोल जावळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
भालोद येथे रावेर मतदार संघातील सर्व अधिकाऱ्यांची समन्वय बैठक श्री जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नागरिकांच्या तक्रारीची अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेवून त्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे. अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई नाईलाजाने कारवाई केली जाईल. असा इशारा यावेळी आमदार अमोल जावळे यांनी दिला.
या बैठकीत महसूल, महावितरण, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगरपरिषद, ग्रामविकास व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महसूल विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, घरकुल, शेती मोजणी, रेशन दुकान या योजनांची सविस्तर आकडेवारी सादर करण्यात आली. नगरपरिषदांच्या स्वच्छता मोहिम, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती व बचत गट प्रभाग संघ कार्यालयाच्या कामकाजावरही चर्चा करण्यात आली.
महावितरण विभागाच्या कार्याचा आढावा घेताना सबस्टेशन उभारणी, सौरऊर्जा प्रकल्प, वीजपुरवठ्याशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा झाली. पोलीस विभागासोबत कायदा-सुव्यवस्था, अवैध गोतस्करी यासारख्या संवेदनशील विषयांवर आढावा घेण्यात आला. चारमाळी येथील आदिवासी वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबत प्रांताधिकारी व आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची सद्यस्थिती, दिरंगाई व तांत्रिक अडचणींवरही विचारमंथन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीस प्रांताधिकारी बबन काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, सावदा विभागाचे अभियंता गणेश महाजन, यावल गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जहांगीर तडवी, जिल्हा परिषदेचे अभियंता रवींद्र इंगळे तसेच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, विशाल जैस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, विशाल पाटील, हरिदास बोचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

krushisewak 
