मतदारांचे बोल : रक्षाताई तुम्ही केलेल्या विकास कामांवर बोला... आम्हाला मोदींची गॅरंटी नको...
तिसऱ्यांदा निवडणूक लढणाऱ्या रक्षा खडसेंसमोर मतदारांच्या भूमिकेमुळे पेच
कृष्णा पाटील/ रावेर
लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरलेल्या विद्यमान खासदार रक्षा खडसे या मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला (स्वतःला) विजयी करण्याचे विनंती वजा आवाहन मतदारांना करीत आहेत. मोदींच्या पुन्हा पंतप्रधान होण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र ताई, तुम्ही सलग दहा वर्षे रावेर मतदार संघाचे संसदेत प्रतिनिधीत्व केलेले आहे. या काळात तुम्ही मतदार संघात कोणती विकास कामे केली, कोणते रोजगाराचे प्रकल्प उभे केले, शेतकऱ्यांसाठी कोणत्या सुविधा या काळात निर्माण केल्या, स्थानिक कोणते प्रश्न सोडवले यावर प्रचार करताना आता बोला..."रक्षाताई, तुम्ही केलेल्या विकास कामांवर बोला... आम्हाला मोदींची गॅरंटी नको..." तुम्ही केलेल्या विकास कामांची गॅरंटी द्या...असे मतदार म्हणत आहेत.
मतदारांचा झाला भ्रमनिरास
रावेर लोकसभा मतदार संघातून २०१४ मध्ये भाजपने तत्कालीन विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी पक्षश्रेठींनी जाहीर झालेली जावळेंची उमेदवारी अचानक कापली होती. त्याठिकाणी जावळेंऐवजी तुम्हाला (रक्षा खडसे यांना) उमेदवारी देण्यात आली. मात्र जावळे यांनी त्यावेळी संयम दाखवत निष्ठेने पक्षाचे व तुमचे काम केले. पक्षाने दिलेला आदेश जावळे यांनी शिरसावंद्य मानला. तुम्हाला विजयी करण्यात स्व. हरिभाऊ जावळे यांचा मोठा सहभाग होता हे विसरता येणार नाही. जावळे यांची उमेदवारी कापण्यात व ती उमेदवारी तुम्हाला मिळण्यात राज्यातील भाजपच्या पक्षश्रेठींचा हात होता. तत्कालीन भाजपचे नेते म्हणून एकनाथराव खडसे यांचे त्यावेळी राज्यात व राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व होते. भाजपच्या राष्ट्रीय समितीचे खडसे त्यावेळी सदस्य होते. तुम्हाला उमेदवारी मिळवून देण्यात माजी मंत्री व तुमचे सासरे म्हणून खडसे यांचा सिहांचा वाटा होता. हे त्यावेळी लपून राहिलेले नव्हते. याचा अंदाजही जनतेने तेव्हा लावलेला होता. २०१४ च्या निवडणुकीत तुम्ही विजय मिळवण्यात यशस्वी झाल्या. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा पक्षाने तुम्हाला संधी दिली. त्यावेळी तुमच्या विजयासाठी श्री खडसे यांची मोठी ताकद तुमच्या पाठीशी होती. सलग दहा वर्षे संसदेत प्रतिनिधित्व करण्याची रावेर लोकसभा मतदार संघातील साडे सतरा लाख मतदारांनी त्यावेळी तुम्हाला संधी दिली होती. मात्र या मतदारांचा आता भ्रमनिरास झाला आहे. सलग दुसऱ्यांदा संधी देत तुम्हाला विजयी केल्यावर आपल्या मतदार संघाचा विकास होईल, मतदार संघात उद्योगाचे प्रकल्प उभे राहतील, केळीची परदेशात निर्यात वाढेल, रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सुटतील, मतदार संघातून गेलेल्या महामार्गामुळे विकासाला चालना मिळेल, अशी भाबडी अपेक्षा मतदारांची होती. मात्र तुमच्या कार्यपद्धतीमुळे केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर तुमच्याच पक्षातील तुमच्या विजयासाठी रक्ताचे पाणी करणारे पदाधिकारी व कार्यकर्तेही नाराज आहेत. आतापर्यंत दबक्या आवाजात बोलणारे कार्यकर्ते लोकांजवळ उघडपणे आता बोलू लागले आहेत. यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
पक्षनिष्ठा म्हणून तिसऱ्यांदा उमेदवारी
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा मतदार संघातून पक्षाने तुम्हाला पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे. मधल्या काळात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने ते भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. मात्र तुम्ही पक्ष सोडून श्री खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेल्या नाहीत. तुम्ही पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा तुम्ही राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्ष श्रेष्ठींना दिला. हीच खरी तुमची पक्षनिष्ठा म्हणावी लागेल. पक्षनिष्ठेचा तुमचा आदर्श इतर राजकारण्यांनी घेण्याची गरज आहे. तुमच्या पक्षनिष्ठेचा विचार करून पक्षाने आता तुम्हाला पुन्हा तिसऱ्यांदा लोकसभेची रावेर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. पक्षनिष्ठेचे फळ म्हणून तुम्हीही याचा गाजावाजा करीत आहेत. मात्र आता मतदारांसमोर जातांना तुम्हाला गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचावा लागणार आहे हे विसरून चालणार नाही.
ताई, आता विकास कामांवर बोला...
नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला विजयी करा असे कॅम्पेनिंग पक्षातर्फे करण्यात येत आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याबाबत कोणाचीही हरकत नाही किंवा याबाबत कुणाचेही दुमत नाही. मात्र ताई, तुम्हाला आता विजयासाठी मोदींची गॅरंटी देऊन चालणार नाही. मतदार संघात तुम्ही काय विकासकामे केली याचा पाढा मतदारांसमोर वाचण्याची तुमच्यावर वेळ आली आहे. केलेल्या विकसकामांचा उहापोह प्रचार करताना भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या व मोदींच्या कामांवर मते मागण्याची वेळ कधीच गेलेली आहे. मतदार संघातील सुज्ञ मतदार आता म्हणतायेत " ताई तुम्ही केलेल्या विकास कामांवर बोला... आम्हाला आता मोदींची गॅरंटी नको..."