सेंद्रिय उत्पादनांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार

पुणे येथे सेंद्रिय शेती-शेतकरी संवाद मेळाव्यात आश्वासन

सेंद्रिय उत्पादनांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार

पुणे /प्रतिनिधी 

सेंद्रिय व विषमुक्त शेतीतील प्रश्न मोर्फा संघटनेच्या माध्यमातून समजून घेऊन ते प्रश्न राज्य व केंद्र सरकार पुढे मांडणार असून त्याची सोडवणूक होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी व्यक्त दिले .

शिवाजीनगर( पुणे )येथील कृषी महाविद्यालयात महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य (मोर्फा) यांच्या वतीने आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती शेतकरी संवाद मेळाव्यात खासदार पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युगेंद्र पवार व्यवस्थापकीय संचालक मोर्फा, कृषी सहसंचालक सुनील बोरकर, मोर्फा अध्यक्ष कृषीभूषण अंकुश पडवळे, कृषीभूषण स्वाती शिंगाडे उपाध्यक्ष-मोर्फा, कृषीभूषण प्रल्हाद वरे सचीव-मोर्फा, सुदामराव इंगळे, मानीकराव झेंडे, डॉ राजेश कोकरे, मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव, आधी उपस्थित होते.

 पुढे बोलताना पवार म्हणाले की, सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्याची विश्वासार्हता अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेती क्षेत्रात बदल होत आहेत. त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजे. मोर्फा संघटना राज्यात विषमुक्त व सेंद्रिय शेतीतील प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणत आहे. सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर लवकरच बैठका घेऊन सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवणे व मार्केटिंगसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन खा. पवार यांनी बोलताना दिले.

 मोर्फा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार बोलताना म्हणाले की, सेंद्रिय शेतीला बळकटी आणण्यासाठी मार्केटची चैन उभी करून सेंद्रिय उत्पादनांना शाश्वत मार्केट उभे करण्यासाठी मोर्फा संघटनेच्या माध्यमातून लवकरच प्रयत्न केले जातील. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत असून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करून चांगले गुणवत्तापूर्ण सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काळात तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल. 

मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे बोलताना म्हणाले की, सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत. पण मार्केटिंगमध्ये शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे. खा. शरद पवार यांनी राज्य व केंद्र सरकार बरोबर सेंद्रिय शेतीच्या प्रश्नाबाबत अनेक बैठका घेऊन राज्याचे सेंद्रिय शेतीचे धोरण बनवण्यामध्ये पवार साहेबांचा महत्त्वाचा वाटा आहे. यापुढे आपणाला नैसर्गिक शेतीपेक्षा शाश्वत सेंद्रिय शेतीची गरज असून त्या दृष्टीने मोर्फा संघटना राज्यामध्ये पावले टाकत असल्याचेही पडवळे यांनी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित पुणे, मावळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशीक, धुळे, जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर (अ नगर), नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), बीड, उस्मानाबाद, लातुर, परभणी, नांदेड, पालघर, येथून आलेल्या केंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची थेट संवाद खासदार पवारांनी साधला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोर्फाच्या उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे यांनी केले. सदर सेंद्रिय शेती शेतकरी परिसंवाद बैठकीस राज्यभरातून सेंद्रिय व विषमुक्त शेती करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण काटे, नितीन तावरे, मदन वाबळे, हृषिकेश गायकवाड, वैभव वाघमोडे, विनय वर्पे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ यादव यांनी केले.