भेसळयुक्त बियाणे प्रकरणी कृषिधन सिड्स कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका : शेतकऱ्याला व्याजासह नुकसान भरपाई करण्याचा आदेश

दीड महिन्यात रक्कम शेतकऱ्याला द्यावी

भेसळयुक्त बियाणे प्रकरणी कृषिधन सिड्स कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका : शेतकऱ्याला व्याजासह नुकसान भरपाई करण्याचा आदेश

जिल्हा प्रतिनिधी / नांदेड

सोयाबीनचे भेसळयुक्त बियाणे निघाल्याने शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीची जिल्हा ग्राहक निवारण न्यायालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणी भेसळयुक्त बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी कृषिधन सिड्स या बियाणे निर्मिती कंपनीला दीड महिन्याच्या आत शेतकऱ्याला व्याजासह नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. 

कांडाळा ता नायगाव जि नांदेड येथील शेतकरी दत्ता झिंकवाड यांनी 20 मे 2021 रोजी नरसी येथील वरद कृषी सेवा केंद्रातून कृषिधन सिड्स या कंपनीच्या 5800 रुपयांना सोयाबीनच्या दोन बॅग खरेदी केल्या होत्या. या बियाण्याची पेरणी केल्यावर पेरणीनंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी अनुकूल वातावरण होते. सदर शेतकऱ्याने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाला योग्य वेळी खत दिले. तसेच नियमितपणे पिकाची निगराणी करत पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. मात्र काही दिवसांनी शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांची रोपे आढळून आल्याने झिंकवाड यांनी कृषी सेवा केंद्राकडे तक्रार केली. परंतु कृषी केंद्र चालकाने शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. पंचनामा करून सोयाबीनचे पिकात 50 टक्के भेसळयुक्त असल्याचा अभिप्राय दिला. यानुसार शेतकऱ्याने कृषीधन सिड्स कंपनी व वरद कृषी सेवा केंद्राकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु नुकसान भरपाई देण्यास शेतकऱ्याला कंपनी व कृषी केंद्राने नकार दिला. अखेर शेतकऱ्याने नांदेड जिल्हा ग्राहक निवारण न्यायालयात दावा दाखल केला. कृषी अधिकाऱ्यांचा पंचनामा, त्यांनी दिलेला अभिप्राय लक्षात घेऊन त्यावर न्या. राहुल पाटील, ज्ञानेश्वर पवार व शलाका ढमढेरे यांनी शेतकऱ्याला बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी 18960 रुपये नऊ टक्के व्याजासह द्यावेत. तसेच झालेल्या मानसिक त्रासापोटी 20 हजार व तक्रारीचा दावा खर्च 10 हजार असे एकूण 48960 रुपये दीड महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत.