रावेर मतदार संघ : लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मेगा रिचार्ज प्रकल्प दहा वर्षांपासून अपूर्णच

अरुणभाई गुजराथी यांनी सुनावले खडे बोल

रावेर मतदार संघ : लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मेगा रिचार्ज प्रकल्प दहा वर्षांपासून अपूर्णच

प्रतिनिधी / यावल

रावेर ,यावल व चोपडा या तालुक्यांना वरदान ठरू पाहणारा मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेतच आहे. तर या तालुक्यांमध्ये केळीवर प्रक्रिया होणे आवश्यक असताना खासदारांच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही असे खडे बोल विधानसभा माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेतेअरुणभाई गुजराथी यांनी खासदारांना सुनावले .

रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ यावल येथे कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत  होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, उमेदवार श्रीराम पाटील , रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हाजी शब्बीर शेख, लीलाधर चौधरी, विनोद पाटील, लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकेश येवले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शिवसेना तालुकाध्यक्ष रवींद्र सोनवणे, राष्ट्रवादीचे किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपं पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रावेर यावल चोपडा हा केळी पट्टा आहे. मात्र या भागातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. केळी पीक विम्याचा प्रश्न लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सुटू शकलेला नाही अशी टीका यावेळी अरुणभाई गुजराथी यांनी केली. केंद्र सरकारने महागाई वाढवली आहे. सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. त्यांना आधार देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले आहे. विरोधकांनी आपले नेते हिरावले पण आपली हिम्मत कमी झालेली नाही. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.