प्रतिटोला : कोणताही अभिनंदनाचा ठराव नाही : बाजार समितीत बाहेरच्या व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप व ठरल्याप्रमाणे राजीनामे का दिले नाही ? सभापती सचिन पाटील यांना संचालक प्रल्हाद पाटील यांचा खडा सवाल
जागा मिळवून देण्याचे श्रेय आमदार अमोल जावळे यांचेच
प्रतिनिधी/ रावेर
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात सातत्याने बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप वाढला होता. तसेच ठरल्याप्रमाणे सभापती व उपसभापती यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे का दिले नाही ? असा सवाल संचालक प्रल्हाद पाटील यांनी सभापती सचिन पाटील यांना केला आहे. तर बऱ्हाणपूर रस्त्यावर बाजार समितीला मिळालेली जागा आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नामुळे मिळालेली आहे. याचे श्रेय सभापतींनी घेऊ नये यासाठी पूर्ण संचालक मंडळ प्रयत्नशील होते असा दावा संचालक श्री पाटील यांनी केला आहे. सभापती व उपसभापती विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर दोन्ही गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
माजी आमदार अरुण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत ९ सप्टेबरला भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांच्याविरुद्ध तब्बल १२ संचालकांनी बंड पुकारला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तिसऱ्याच दिवशी ११ सप्टेबरला या दोघांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सभापतींचा व्हिडीओ व्हायरल
अविश्वास प्रस्तावात १२ संचालकांनी दिलेली कारणे सभापती सचिन पाटील यांनी काल सोशल मीडियावरून व्हिडीओ व्हायरल करून खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तर अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे संचालक प्रल्हाद पाटील यांनी सभापती श्री पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेले खुलासे चुकीचे व शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप केला आहे. यावेळी प्रल्हाद पाटील यांनी सभापतींना रोखठोक सवाल केले असल्याने बाजार समितीत अविश्वास प्रस्तावामुळे पडलेल्या दोन गटात राजकीय युद्ध सुरु झाल्याचे दिसून येते.
स्वतःच्या हाताने पाठ थोपटून घेण्याचा प्रकार
बुधवारी झालेल्या बाजार समितीच्या मासिक सभेत जागा मिळाल्याबद्दल सभापती सचिन पाटील यांचा कोणताही अभिनंदनाचा ठराव झालेला नसल्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी सांगितले. स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा सभापतींचा प्रकार असल्याचे संचालक श्री पाटील यांचे म्हणणे आहे.
जागा मिळवून देण्याचे श्रेय आमदार जावळे यांचे
आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नामुळे बाजार समितीला बऱ्हाणपूर रस्त्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एक एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी सर्व संचालक प्रयत्नशील होते. त्यामुळे सभापतींनी जागेचे श्रेय घेवू नये असे रोखठोकपणे सांगितले आहे.
उत्पन्न वाढीचे श्रेय घेणे चुकीचे : मंदार पाटील
रावेर तालुक्यातून जाणाऱ्या केळीच्या वाहनांवर पूर्वी ३०० रुपये मार्केट फी आकारली जात होती . प्रशासक काळात ती ५०० रुपये करण्यात आली आहे. तसेच अन्न धान्य व कडधान्याच्या किंमती वाढल्याने त्यावरील मार्केट फीमध्ये वाढ झाली आहे. मार्केटच्या तोल काट्यावर पूर्वी ५० रुपये प्रती वाहनांवर फी घेतली जात होती टी १०० रुपये प्रशासक काळात केलेली आहे. तसेच व्यापारी लायसन्स रिनिव्हल फी २०० रुपयावरून १००० रुपये करण्याचा निर्णय प्रशासक काळात घेतलेला आहे. त्यामुळे सभापती सचिन पाटील यांनी उत्पन्न वाढवले असे म्हणणे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहे. प्रशासक काळात घेतलेल्या निर्णयांची संचालक मंडळाने अंमलबजावणी केल्यामुळे मार्केटचे उत्पन्न वाढले आहे ही वस्तुस्थिती असल्याचे संचालक मंदार पाटील यांनी सांगितले.
बाहेरील व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप
बाजार समितीच्या कामकाजात व निर्णय प्रक्रियेत बाहेरील व्यक्तींचा गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढला होता. त्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेतांना संचालक मंडळाला अडचणी येत होत्या. याचा परिणाम कामकाजावर होऊन मार्केटमध्ये असंतोष निर्माण झाला होता असे संचालक प्रल्हाद पाटील यांनी सांगितले.
ठरल्याप्रमाणे राजीनामा का दिला नाही ?
निवडणुकीनंतर सभापती व उपसभापती पदासाठी विशिष्ट काळ ठरवीत चक्राकार पद्धतीने निवड निशित करण्यात आली होती. मात्र मुदत संपूनही सभपती व उप सभापतींनी राजीनामा का दिला नाही ? असा खडा सवाल संचालक प्रल्हाद पाटील यांनी सभापती सचिन पाटील यांना विचारला असून त्यांनी दिलेला खुलासा खोडून काढला आहे.

krushisewak 
