अत्यवस्थ बस चालकाने वाचवले प्रवाशांचे जीव
चालकाचे प्रसंगावधान , रावेरातील घटना,
कृष्णा पाटील / रावेर
बुलढाणा जिल्ह्यातील बस अपघाताची घटना मन सुन्न करणारी असतानाच रावेर आगारातील चालकाच्या प्रसंगावधानामुळे खचाखच प्रवाशांनी भरलेल्या बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहे. रक्तदाब वाढल्याने अत्यवस्थ झालेल्या चालकाने बस त्वरित रस्त्याच्या कडेला उभी केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या बस चालकाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने पुढील अनर्थ टाळला आहे.
शनिवारी (ता १ जुलै ) रावेर आगाराची बऱ्हाणपूर नाशिक बस बऱ्हाणपूर येथून नाशिक रावेरकडे येत होती. मात्र शहरापासून काही अंतरावर या बसच्या चालकाची अचानक रक्तदाब वाढल्याने तब्बेत अचानक बिघडली. चालकाने प्रसंगावधान राखत त्वरित बस रस्त्याच्या कडेला उभी करीत डोके स्टेअरिंगवर ठेवले. यावेळी मोटारसायकवरून जाणाऱ्या केऱ्हाळा येथील दीपक पाटीलला कट बसल्याने त्याने स्वतःला सावरले. व जाब विचारण्यासाठी थांबलेल्या बस जवळ येउन पहिले असता चालक तोहफिक शेख अत्यवस्थ अवस्थेत दिसले. यावेळी तात्काळ वाहक राजू तडवी, अस्लम तडवी यांच्या मदतीने दिपकने अत्यवस्थ चालकाला शहरातील श्रीपाद हॉस्पिटलला आणले. डॉ. योगेश पाटील यांनी चालकावर तातडीने उपचार केल्याने जीव वाचला. चालक शेख यांनी दाखवलेली समयसूचकता व देवाची कृपा म्हणून खचाखच भरलेल्या बस मधील प्रवाशांचा जीव वाचला आहे. रावेर आगारात संपर्क साधून सर्व माहिती दिल्यावर दुसऱ्या चालकाची नियुक्ती करून ती बस पुढे नाशिकसाठी रवाना झाली. आगाराच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. काळ आला होता पण वेळ अली नव्हती असेच या घटनेबाबत म्हणावे लागेल.