शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार : सफरचंदाच्या उत्पादक्तेत वाढीची अपेक्षा

शेतकऱ्यांचा विचार करून संशोधन : अजित जैन

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार : सफरचंदाच्या उत्पादक्तेत वाढीची अपेक्षा
सामंजस्य कराराच्या प्रती हस्तांतरण करताना शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू नजीर अहमद गनई, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व दोन्ही संस्थांचे सहकारी.

प्रतिनिधी / जळगाव

जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे हायटेक तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील शेर-ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ  यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे. जळगावच्या जैन हिल्सवर झालेल्या या करारावर कंपनीतर्फे सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी तर विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा.नझीर अहमद गनाई यांनी सह्या केल्या आहेत.

आधुनिक पद्धती व तंत्र वापरून विविध पिकांचे उत्कृष्टरितीने उत्पादन, जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या समस्यांचा प्रभावीपणे सामना आणि आवश्यक तेवढीच संसाधने वापरून उत्पादन व उत्पादकतेत वाढ यासंबंधीचे मार्गदर्शन जैन कंपनीतर्फे काश्मीर मधील शेतकऱ्यांना केले जाणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना ऊतीसंवर्धन (टिश्यूकल्चर) व जैव तंत्रज्ञानाचा (बायोटेक्नॉलॉजी) वापर करून तयार केलेले उत्कृष्ट प्रतीचे, उच्च दर्ज्याचे, रोगविरहीत व व्हायरसमुक्त लागवडीचे साहित्य पुरवले जाणार आहे.  तसेच शेती क्षेत्रातील शाश्वतता कायम राखण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान व त्यासाठी वापरली जाणारी साधने आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना आज भेडसावत असलेल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीने जैन कंपनी मार्गदर्शन करणार आहे.

सफरचंदाच्या उत्पादनात वाढीची अपेक्षा : कुलगुरू

सफरचंदाची जम्मू-काश्मीरची उत्पादकता हेक्टरी १० टन, हिमाचलची ८ ते ९ टन तर पश्चिमात्य देशांची ६७ टन आहे. आपली उत्पादकता कमी असल्याने उत्पादन खर्च वाढतो व निर्यातीला मर्यादा येतात. जैन कंपनीशी करार केल्यामुळे आधुनिक संशोधन व तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. याचा परिणाम उत्पादक्तेत वाढ होईल अशी अपेक्षा जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नझीर अहमद गनाई यांनी व्यक्त केली.  सफरचंद, केशर आणि काळेजिरे या पिकांच्या संशोधन व उत्पादन वाढीसंबंधी जैन इरिगेशनने मार्गदर्शन करावे अशी आमची अपेक्षा आहे.

 शेतकऱ्यांचा विचार करून संशोधन : अजित जैन

जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या उन्नती व प्रगतीसाठी होत असलेल्या या कराराचा आम्हांला अभिमान आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांनी आयुष्यभर सर्वसामान्य व छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून त्या दिशेने संशोधन व तंत्रज्ञान विकसीत केले. ते आज देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे. सिंचनासाठी लागणाऱ्या उत्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याबरोबरच स्वच्छ, शुद्ध व रोगमुक्त दर्जेदार रोपे-कलमे व लागवडीचे अन्य साहित्य आणि अचूक व परिपूर्ण शेतीसाठी (प्रिसीजन फार्मिंगसाठी) लागणारे तंत्रज्ञान आम्ही कृषी विद्यापीठ व शेतकऱ्यांना पुरविणार आहोत. त्यामुळे त्या प्रांतातील कमीत कमी संसाधनांचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन शाश्वतरितीने वाढू शकेल.