तत्परता : आमदार अमोल जावळे यांचा प्रवाशांना दिलासा : मागणीनंतर २४ तासात बस सुरु
रावेर-भुसावळ मार्गांवर दिवसभर शटलसेवा
प्रतिनिधी / रावेर
रावेर येथून भुसावळ येथे दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. मात्र संध्याकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान भुसावळ येथून रावेरकडे येणारी बस नसल्याने विशेषतः महिला प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे शुक्रवारी आमदार अमोल जावळे यांच्याकडे ही समस्या मांडण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता विभागीय नियंत्रकांना पत्र पाठवून भुसावळ ते रावेर शटल बस सेवा सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. श्री जावळे यांच्या पत्राची दखल घेत २४ तासात आजपासून भुसावळ ते रावेर शटल बससेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती विभागीय नियंत्रक दिलीप बंजारा यांनी दिली आहे.
रावेर येथून शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त दररोज भुसावळ येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र वेळेवर बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यव्य होत होता. तसेच एसटी महामंडळाचेही आर्थिक नुकसान होत होते. संध्याकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान भुसावळ येथून रावेरकडे येणारी बस सुरु करण्याची मागणी शुक्रवारी प्रवाशांनी आमदार अमोल जावळे यांच्याकडे केली होती. या मागणीची श्री जावळे यांनी तात्काळ दखल घेत विभाग नियंत्रकांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांनी भुसावळ आगार प्रमुखांना आदेश करून या मार्गावर विनाविलंब व विनासबब शटल बस सेवा सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजपासून भुसावळ आगाराने (दि.२९) भुसावळ-रावेर मार्गांवर शटल बससेवा सुरु करण्यात आली आहे. आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल प्रवाशांनी आमदार श्री जावळे यांचे आभार मानले आहेत.
शटल बससेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : भुसावळ-रावेर : सकाळी-7:15, 10:35, दुपारी-14:00 संध्याकाळी-17:30 रावेर-भुसावळ : सकाळी-8:55, दुपारी-12:15, 15:40 संध्याकाळी-19:10

krushisewak 
