BREKING : रावेर तालुक्यात दुसऱ्यांदा अवकाळीचा तडाखा : केळी बागांचे कोट्यावधीचे नुकसान : गहुखेड्यात झाडाखाली दाबल्याने बैलजोडी जखमी
उद्यापासून पंचनामे करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना

प्रतिनिधी / रावेर
अवकाळी पावसाने महिनाभरात पुन्हा दुसऱ्यांदा रावेर तालुक्याला तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कापणीला आलेल्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खंडित झाली आहे. गहुखेडा येथे बैलजोडीच्या अंगावर झाड पडल्याने दोन बैल जखमी झाले आहेत. आमदार अमोल जावळे यांनी तहसीलदार बी ए कापसे यांच्याशी संपर्क साधून नुकसानीचे उद्यापासून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
13 एप्रिलला वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान केले होते. त्यानंतर महिन्याच्या आत आज पुन्हा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रावेर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास तापी काठावरील रणगाव, रायपूर, गहुखेडा, तासखेडा व या परिसरातील गावांना जोरदार तडाखा दिला. यात मोठ्या प्रमाणावर कापणीला आलेल्या केळी बागांची खोडे मोडून पडल्याने अतोनात नुकसान झाल्याची माहिती गहुखेड्याचे शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली आहे. गहुखेडा येथील संजय विश्राम चौधरी यांच्या बैलजोडीच्या अंगावर झाड पडल्याने त्यात दोन्ही बैल जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत अशी माहिती शिवाजी पाटील यांनी दिली. झाड पडल्याने दुसखेडा-उदळी रस्त्यावर वाहतूक खंडित झाली होती. तसेच अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्यावर विवरा- वडगाव दरम्यान झाड पडल्याने या महामार्गांवर दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तात्काळ प्रशासनाने रस्त्यावरील झाडे बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत झाली.
रावेरला झाड पडल्याने नुकसान
वादळामुळे येथील सरदार जी जी हायस्कुल कॉम्प्लेक्स समोरील कोरडे झाड पडल्याने यामुळेएका व्यवसायिकाचे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी थांबून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान ग्रामीण भागासह शहरात सहा वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना : आमदार जावळे
रावेर तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या पिकांचे तसेच मालमत्तेच्या नुकसानीचे उद्यापासून पंचनामे करण्याच्या सूचना आमदार अमोल जावळे यांनी तहसीलदार बी ए कापसे यांना दिल्या आहेत.
जीवित हानी नाही : कापसे
वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. पिकांच्या नुकसानीची माहिती मिळाली असून तालुक्यात कोणतीही जीवित हानी नसल्याचे तहसीलदार बी ए कापसे यांनी सांगितले.