कृषीसेवक न्यूज नेटवर्क/ रावेर
केळी कामासाठी दुचाकीने जाणाऱ्या केळी कामगाराचा ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता आहिरवाडी-पाडला रस्त्यावर घडली. अपघातात ठार झालेल्या मजुराचे मनोज कडू वाघ असे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहिरवाडी येथील रहिवाशी व केळी मजुरीचे काम करणारा मनोज कडू वाघ वय २६ या युवकाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमपी ०९ के डी ६८१८ ने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. अपघातात जखमी झालेल्या मनोज वाघ याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मनोज याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. तर त्याची पत्नी गर्भवती असल्याने प्रसूतीसाठी नाचनखेडा येथे माहेरी गेल्याची माहिती मनोजच्या नातेवाईकांनी दिली आहे. अपघात प्रकरणी विनोद बळीराम वाघ याच्या फिर्यादीवरून ट्रकचालक मोहमद शरीफ मोहम्मद इस्माईल रा नागझिरी मोहल्ला, काद्रिया शाळेजवळ बऱ्हाणपूर याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर पुढील तपास करीत आहेत.