ब्रेकिंग : महादेव पाण्यात : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली रावेर तालुक्याची पाहणी
प्रशासन सज्ज, तापी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/ रावेर
शुक्रवारी संध्याकाळपासून रावेर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तापी नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाचे बॅकवॉटर रस्त्यावर आल्याने सकाळपासून ऐनपूर-निंबोल, निंबोल-विटवा, खिरवड-नेहेता, उटखेडा-कुंभारखेडा हे रस्ते पाण्याखाली गेले आहे. निंबोल येथील ऐनपूर रस्त्यावरील महादेव मंदिरात तापीचे बॅक वॉटरचे पाणी शिरल्याने महादेव पाण्यात अशीच अवस्था झाली आहे.
यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. तर जुन्या अजनाड गावात तापी नदीच्या पुराची पाणी पातळी वाढली असून तहसिलदार बंडू कापसे यांनी येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. तापी नदीच्या पुराची पाणी पातळी वाढत असल्याने तालुक्यातील तापी नदी काठावरील नागरीकांना तहसिलदार कापसे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. खिरवड-नेहेता रस्त्यावरील सखल भागात पुराचे पाणी शिरल्याने या भागातील नागरिक व गुरांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर यांनी दिली.
शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून पावसाला सुरूवात झाली असून १५ तासापासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तापी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने सकाळी ऐनपूर-निंबोल रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच सुकी नदीला पूर आल्याने उटखेडा-कुंभारखेडा रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. निंबोल-विटवा रस्त्यावर बॅक वॉटरचे पाणी आहे. तर ऐनपूर येथील कब्रस्थान, हिंदू स्मशानभूमी व उर्दू शाळेपर्यंत पुराचे पाणी पोहचल्याची माहिती सरपंच अमोल महाजन यांनी दिली. येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान यामुळे या रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतांमध्ये पुराचे पाणी गेल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
निंबोलला महादेव पाण्यात
तापी नदीचे बॅक वॉटर निंबोल- ऐनपूर रस्त्यावर आल्याने या ठिकाणी असलेले महादेव मंदिर पाण्याखाली गेले आहे. संपुर्ण मंदिर पाण्याखाली गेले असून फक्त मंदिराचा कळस दिसत आहे. येथे सुमारे दहा फूट पाणी असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती जितू पाटील यांनी दिली आहे.
पावसात तहसिलदार पाहणीसाठी रस्त्यावर
पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पूर परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाय योजना करण्यासाठी तहसिलदार बंडू कापसे भर पावसात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी अजनाड येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी पुराच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच तालुक्यातील तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व गावांचे तलाठी, पोलिस पाटील, व शासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
खिरवडला नागरिकांचे स्थलांतर
खिरवड- नेहेता रस्त्यावर असलेल्या पुलावर पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच पुराचे पाणी खिरवड येथील सखल भागातील नागरिकांच्या घरात घुसल्याने या भागातील काही नागरिकांचे व गुरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर यांनी दिली.