उटखेडा ग्रामपंचायतीच्या कारभाराची तऱ्हाच न्यारी : शासकीय नियम धाब्यावर : ग्रामपंचायत पदाधिकारी दौऱ्यावर

ग्रामपंचायतीच्या निधीची उधळपट्टी

उटखेडा ग्रामपंचायतीच्या कारभाराची तऱ्हाच न्यारी : शासकीय नियम धाब्यावर : ग्रामपंचायत पदाधिकारी दौऱ्यावर
प्रतिनिधी / रावेर
गावातील समस्याकडे दुर्लक्ष करीत रावेर तालुक्यातील उटखेडा येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या तीन  दिवसापासून ग्रामपंचायतीला अक्षरशः कुलूप लावून अभ्यास दौऱ्यावर गेलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना असा अभ्यास दौरा करण्याची शासकीय तरतूद नसताना ग्रामसेवक शामकुमार पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून दौऱ्याचे नियोजन केले आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवून पदाधिकारी अभ्यासाच्या नावाखाली दौऱ्यावर  गेले आहेत. दरम्यान शुक्रवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत शिपायाला ग्रामपंचायत कार्यालय उघडे करून ठेवण्याची सूचना दौऱ्यावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 
गावात समस्यांचा डोंगर आ वासून उभा असतांना या समस्या सोडविण्याऐवजी पदाधिकारी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मौजमजा करण्यात व्यस्त आहेत. ग्रामपंचायतीच्या निधीची अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांकडून उधळपट्टी सुरु आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
नियम धाब्यावर पदाधिकारी दौऱ्यावर 
ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय नियमानुसार अभ्यास दौरा करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही. किंवा ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना नियमानुसार असा अभ्यास दौरा करता येत नाही. मात्र येथील ग्रामसेवक व  पदाधिकारी शासकीय नियम धाब्यावर बसवून गेल्या तीन दिवसापासून ग्रामपंचायतीला कुलूप लावून दौऱ्यावर गेले आहेत. याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात निवडून आलेल्या महिला सदस्यांच्या पतीला भाग घेता येत नाही असा शासनाचा नियम असतांना या दौऱ्यात येथील महिला सदस्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. ग्रामसेवक शामकुमार पाटील यांनी शासनाच्या या आदेशाची पायमल्ली केली असून  नियमाचा भंग केला आहे. 
ग्रामसेवकाने मुख्यालय कसे सोडले ?
सध्या पावसाळ्याचे दिवस असून विविध साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात पूर्वपरवानगी शिवाय  ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडू नये असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश असतांना अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली ग्रामसेवक शामकुमार पाटील यांनी मुख्यालय कसे सोडले ? याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत रावेर पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे यांना विचारले असता मी निवडणुकीच्या कामात होतो. याबाबत मला माहिती नाही असे सांगून कानावर हात ठेवले आहेत.