आमदार अमोल जावळे यांच्याकडून रावेर आगाराची झाडाझडती : आगार प्रमुखांना सुनावले: बस स्थानकात थुंकणाऱ्या कर्मचाऱ्याला फटकारले : कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना
ग्राउंड लेव्हलवर उतरून प्रवाशांच्या तक्रारींची दखल
प्रतिनिधी / रावेर
रावेर आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत तसेच शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आमदार अमोल जावळे यांच्याकडे प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी या तक्रारी केल्या होत्या. याची तात्काळ दखल घेत आज संध्याकाळी सहा वाजता श्री जावळे यांनी येथील बसस्थानकावर येत प्रवाशी व विद्यार्थ्यांशी चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या. त्यांनतर आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांना याबाबत जाब विचारला. कर्मचाऱ्यांमुळे बस वेळेत सुटत नसल्याचे यावेळी आगार प्रमुखांनी मान्य केले. कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी श्री जावळे यांनी दिल्या आहेत. ग्राउंड लेव्हल उतरून आमदार अमोल जावळे यांचे कामकाज सुरु असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान याचवेळी एक कर्मचारी बसस्थानकात थुंकल्याने श्री जावळे यांनी त्याला सर्वांसमोर चांगलेच फटकारले.
बसस्थानक परिसराची पाहणी
वाशी व शालेय विद्यार्थ्यांच्या बस वेळेवर सुटत नसल्याच्या तसेच कर्मचारी प्रवाशांशी आरेरावी करीत असल्याच्या तक्रारी आमदार जावळे यांच्याकडे सातत्याने येत होत्या. त्यानुसार आज येथील बसस्थानकावर येत श्री जावळे यांनी प्रवाशी, महिला प्रवाशी, शालेय विद्यार्थिनीशी संवाद साधला. यावेळी प्रवाशांनी व विद्यार्थिनींनी समस्यांचा पाढाच वाचला. त्यांनतर बस स्थानकातील प्रसाधन गृह, कर्मचाऱ्यांचा आराम कक्ष, कर्मचाऱ्यांच्या प्रसाधन गृहाची व परिसराची पाहणी केली. आगारातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभाराला आगार व्यवस्थापक जबाबदार असल्याने यात सुधारणा करण्याच्या सूचना श्री जावळे यांनी आगार व्यवस्थापक पठाण यांना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, एटीएस श्री अडकमोल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सी एस पाटील, दीपक पाटील, मनोज श्रावगे, रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी अधिकारी व प्रवाशी उपस्थित होते.
थुंकणाऱ्या कर्मचाऱ्याला फटकारले
आमदार अमोल जावळे विद्यार्थिनींच्या समस्या एकूण घेत असताना त्याचवेळी बसकडे जाणारा एक कर्मचारी थुंकला. हे लक्षात येताच श्री जावळे यांनी त्याला थांबवत सर्वांसमोर चांगलेच फटकारले. मात्र याचवेळी तेथे उभ्या असलेल्या एका कर्मचाऱ्याने सावध पवित्रा घेत कर्मचाऱ्याला माफी मागायला लावली. या घटनेची बसस्थानकावर प्रवाशांमध्ये चर्चा होती.