रावेरला बस-मोटारसायकल अपघातात दोन जण गंभीर जखमी : उपचारासाठी जळगावला रवाना

दुचाकीस्वार तांदलवाडीचे

रावेरला बस-मोटारसायकल अपघातात दोन जण गंभीर जखमी : उपचारासाठी जळगावला रवाना

प्रतिनिधी/ रावेर

रावेर-सावदा रस्त्यावरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ बस व मोटारसायकल मध्ये झालेल्या अपघातात मोटारसायलवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.

जळगाववरून रावेरकडे येणारी बस क्रमांक MH 20 BL 3006 ही रावेर सावदा रस्त्यावरील शहराबाहेरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ आली असता मोटारसायकल व बसचा अपघात झाला. मोटारसायकल स्वाराने या पंपावर पेट्रोल भरून रस्त्यावर येत असतांना हा अपघात घडल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. या अपघातात सार्थक विजय पाटील (वय 20 )व विजय तुकाराम पाटील (वय 53) रा तांदलवाडी ता रावेर हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे.