ब्रेकिंग : रावेर तालुक्यात सतत नऊ तास पाऊस
पुरात वाहणारे पाच जण बचावले, अनेक रस्ते बंद , घरांमध्ये पाणी घुसले
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
रावेर तालुक्यात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. तसेच सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावातील घरात पाणी घुसले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक खंडित झाली आहे. वडगावजवळ नाल्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या एकाला नागरिकांनी समयसूचकता दाखवत वाचवले आहे. अजांदा येथील पुलावरून वाहणाऱ्या पुरात एक चार चाकी वाहन वाहून गेले आहे. मात्र या वाहनातील चौघांनी उड्या मारून बाहेर आल्याने ते बचावले आहे.तालुक्यात सकाळपासून सतत नऊ तास पाऊस झाला. तहसीलदार बंडू कापसे पुर परिस्थितीची पाहणी करीत आहेत.
रावेर तालुक्यात आज (बुधवारी)सकाळी सात वाजता पावसाळा सुरुवात झाली . सतत नऊ तास पाऊस झाल्याने रावेर शहरातून गेलेल्या नागझिरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे दक्षता म्हणून पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी जुना सावदा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसेच सातपुड्यात झालेल्या पावसाने अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
खिर्डीत पाणी घुसले, अनेक रस्ते बंद
वडगावजवळ नाल्याला पूर आल्याने रावेर-सावदा या रस्त्यावरील वाहतूक खंडित झालीआहे. पावसामुळे खिर्डीच्या नाल्याला पूर आल्याने संपूर्ण बसस्थानक परिसर पाण्याखाली गेला आहे. यामुळे बलवाडी, निंभोरा, भामालवाडी या गावांकडे जाणारी वाहतूक खंडीत झाली आहे. या भागातील काही घरांमध्ये पाणी घुसले असून दोन तीन व्यावसायिकांच्या टपऱ्या पुरात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. उटखेडा येथील नाल्याला पूर आल्याने संपूर्ण बसस्थानक परिसर पाण्याखाली गेला आहे. सुकी नदीला पूर असल्याने उटखेडा-कुंभारखेडा, पाल-खिरोदा, या रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली आहे. पातोंडी येथील वाय पॉइंटवर पाणी निंभोरासिम, खिरवड, नेहेता, दोधे व रावेरकडे येणारी वाहतूक खंडित झाली आहे. पूनखेडा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव भोकर नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.सावदा-थोरगव्हाण रस्त्यावर पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी काही घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याचे समजते. विवरे येथील वाघाडी नाल्याला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
तहसीलदारांकडून पाहणी
तहसीलदार बंडू कापसे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. पाहणीनंतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार आहेत.