रावेरात अहिल्यादेवींना अभिवादन : अहिल्यादेवींचे विचार समाजाला दिशा देणारे : आमदार अमोल जावळे
अहिरवाडी येथे सामाजिक सभागृहासाठी 1 कोटी मंजूर

प्रतिनिधी/रावेर
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले असून त्यांचे विचार प्रत्येक घटकापर्यंत रुजवण्याची गरज आहे असे मत आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले. रावेर तालुका धनगर समाजातर्फे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातर्फे रावेर शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप माजी सैनिक बहूउद्देशीय सभागृहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर धनगर समाज संघर्ष समितीचे राजन लासुरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती योगेश पाटील, बाजार समितीचे संचालक जयेश कुयटे, लखन सावळे, विकास देशमुख, प्रवीण पाचपोहे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा समाजातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी परीक्षेत प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सामाजिक सभागृहासाठी 1 कोटी : जावळे
अहिल्यादेवींनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. अध्यात्म, राजकारण, प्रशासन यात काम करीत असतांना त्यांनी अनिष्ट प्रथा बंद करण्याचे धाडस दाखवले. त्यांचा हा विचार समाजात रुजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी अहिरवाडी येथे 1 कोटी रुपये खर्चून सामाजिक सभागृह बांधण्यात येणार असून 14 जूनला त्याचे भूमिपूजन होणार असल्याचे श्री जावळे यांनी यावेळी सांगितले.