दखल : रसलपूर व निंभोरा ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातील कामांची चौकशी करणार : बिडीओ मेढे
ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीची दखल
प्रतिनिधी/रावेर
रावेर तालुक्यातील रसलपूर पाठोपाठ निंभोरा ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामांबाबत प्रशासनाकडे तक्रारी आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार असून दोन्ही गावातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल पंचायत समितीच्या बिडीओंनी घेतली आहे. दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
निंभोरा (ता. रावेर) येथील ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून केलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असून या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विनोद मेढे यांच्याकडे ३० डिसेंबरला केलेली आहे. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून या निधीतून झालेल्या कामांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी विनोद मेढे यांनी दिली आहे. निंभोरा येथील ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे, रेखा कोळंबे व मंदाकिनी बऱ्हाटे यांनी सरपंच विकासकामे करतांना विश्वासात घेत नाहीत. तसेच १५ वा वित्त आयोगातून झालेल्या पेव्हर ब्लॉक, गटार बांधकाम व काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार ३० डिसेंबरला बिडीओ विनोद मेढे यांच्याकडे केली आहे. त्यानुसार १५ वा वित्त आयोगातून झालेल्या सर्व कामांची लवकरच चौकशी करण्यात येणार असून यात दोषी आढळणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बिडीओ श्री मेढे यांनी दिली.
रसलपूर येथेही गैरव्यवहाराचा संशय
रसलपूर येथेही ग्रामपंचायतीने याच निधीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय असून येथे १५ वा वित्त आयोगातून झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे यांनी बिडीओ विनोद मेढे यांना रसलपूर ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्नशील असून अधिकारी मात्र त्यांना थारा देत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय असून नातेवाईकांच्या नावावर कामे घेतल्याचे दिसून येत आहे. निंभोरा व रसलपूर येथील ग्रामपंचायतीमध्ये १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकास कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
झारीतले शुक्राचार्य कोण ?
निंभोरा व रसलपूर ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. त्यामुळे या गावांना अधिक निधी मिळालेला आहे. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संगनमताने या निधीत गैरव्यवहार केल्याचा नागरिकांना संशय आहे. या गैरव्यवहारामागे असलेले खरे चेहरे सध्यातरी पडद्यामागे आहेत. या गैरव्यवहारातील झारीतले शुक्राचार्य कोण? याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यानंतर जनतेला दिसून येतील.

krushisewak 
