रावेर तालुक्यात खतांचा काळाबाजार : कागदोपत्री खत उपलब्ध मात्र गोडाऊनमध्ये एकही बॅग शिल्लक नाही

विक्रेत्यांचा स्टॉक तपासण्याची शेतकऱ्यांची मागणीy

रावेर तालुक्यात खतांचा काळाबाजार : कागदोपत्री खत उपलब्ध मात्र गोडाऊनमध्ये एकही बॅग शिल्लक नाही

प्रतिनिधी / रावेर

रावेर तालुक्यातील रासायनिक खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकाकडून मोठ्या प्रमाणावर लिंकिंग करण्यात येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. लिंकिंगद्वारे खत न घेणाऱ्या शेतकऱ्यांना खत शिल्लक नसल्याचे सांगत कृषी केंद्र चालक वाटण्याच्या अक्षता लावून परत पाठवीत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. खत विक्रेत्यांकडे खताचा स्टॉक शिल्लक असतांना गोडावूनमध्ये मात्र खताचा दाणा शिल्लक नाही ही आजची स्थिती आहे. विभागीय व जिल्हास्तरीय गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी रावेर तालुक्यातील खत विक्रेत्यांच्या स्टॉक रजिस्टर व गोडावूनची कसून तपासणी केल्यास खरा प्रकार उजेडात येणार आहे. रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खतांचा काळाबाजार सुरु असून याची जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षकांनी दखल घेण्याची गरज आहे.

सध्या खरीप हंगामाचे दिवस असून रावेर तालुक्यात रासायनिक खतांची शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मात्र कृषी विभागाच्या गुण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या खतांची लिकिंग पद्धतीने विक्री करण्यात येत आहे. लिंकिंगद्वारे खत न घेणाऱ्या शेतकऱ्यांना खत उपलब्ध नसल्याचे कारण सांगत कृषी केंद्र चालक वाटण्याच्या अक्षता लावून माघारी पाठवत आहेत. खत विक्रेत्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर खतासाठी वणवण फिरावे लागत आहे. 

खतांचा बिनबोभाट काळाबाजार

लिंकिंग पद्धतीने खत न घेणाऱ्या शेतकऱ्यांची खतासाठी दमछाक होत असतांना कृषी केंद्र चालकांकडून मात्र बिनबोभाटपणे खतांचा काळाबाजार सुरु आहे. खत विक्रेत्यांच्या स्टॉक रजिस्टरवर खतांचा साठा शिल्लक असल्याची नोंद असतांना याच विक्रेत्यांच्या गोडावूनमध्ये खताचा दाणाही शिल्लक नसल्याची वस्तुस्थिती आहे. स्टॉक रजिस्टरवर खत साठा शिल्लक असतांना मग हा साठा कुठे गेला याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून सत्यता समोर आणावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

गुण नियंत्रकाचा आशीर्वाद

तालुक्यातील कृषी केंद्रांना भेटी देऊन तपासानी करण्याचे अधिकार आता फक्त तालुकास्तरीय गुण नियंत्रकांना आहेत. मात्र या अधिकाऱ्यांचे कृषी विक्रेत्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने कारवाई होत नसल्याची माहिती एका कृषी विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. यावरून गुण नियंत्रकांचाच रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांना आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.