परिसंवाद : शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : जैन इरिगेशन व अंकूर सिडसतर्फे तूर पीक परिसंवाद व शिवार फेरी
कापसात तुरीच्या अंतरपीकाचा प्रयोग यशस्वी : अंकुर सीड्सचे सरव्यवस्थापक अमोल शिरसाठ
प्रतिनिधी / जळगाव
शेतकऱ्यांनी बाजारात जे विकले जाईल ते पिकवावे. बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांची निवड करून लागवड करावी. त्यासाठी प्रगत उच्च कृषितंत्रज्ञान, ठिबक सिंचन, खते, मोबाईलसारखे तंत्रज्ञान वापरून गुणवत्तेचे भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि अंकुर सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांच्या नेरी पळसखेडे रस्त्यावरील शेतात तुर पीक परिसंवाद व शिवार फेरीच्या आयोजित कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. कृषीभूषण श्री विश्वासराव पाटील (लोहारा) हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, माजी प्रकल्प संचालक (आत्मा) अनिल भोकरे, अनिल चौधरी, दिलीप खोडपे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि बळीराजाचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्री प्रसाद पुढे म्हणाले कि, जिल्ह्यात साडेपाच हेक्टरवर कापूस लावला जातो. त्यात कडधान्य उडिद, मूग, तूर या पिकांना प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वात जास्त रासायनिक खतांचा वापर करतो. भूजल पातळी खूप खाली गेली आहे. भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने भूजल पातळी खालावली आहे. प्रशासन यावर योग्य काम करीत असून शेतकऱ्यांनीही सजगता ठेवायला हवी असे आवाहनही त्यांनी केले. जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, अंकुर सीड्स प्रा. लि. नागपूरचे सरव्यवस्थापक अमोल शिरसाठ, तुर पैदासकार नरेंद्र सावरकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी मार्गदर्शन केले.
जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन : कृषिभूषण विश्वासराव पाटील
‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व मातीला सजीव ठेवावे असे आवाहन कृषीभूषण श्री विश्वासराव पाटील यांनी केले. आयोजकांतर्फे पाहुण्यांचे स्वागत केले गेले. जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, जैन इरिगेशनचे वितरक ऍग्रो जंक्शनचे संचालक आणि प्रगतशील शेतकरी दिनेश पाटील हे आपल्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवलंबत असतात. या तुरीच्या शेतात सुयोग्य पिकाचे वाण, दोन झाडांचे अंतर, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनाचे व्यवस्थापन याविषयी सांगितले. पाण्याचे व खताचे चांगले व्यवस्थापन करावे आणि भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.
अंतरपिकाचा प्रयोग करावा : अमोल शिरसाठ
कपाशी आणि त्यात तूर पीक आंतरपीक म्हणून घेतले जाते. यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होते. शेतकऱ्यांनी अंतरपिकाचा प्रयोग करावा असे अंकुर सीड्स प्रा. लि. नागपूरचे सर व्यवस्थापक अमोल शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. कपाशीसाठी कंपनीने मोठ्या बोंडाचे संशोधन केले आहे. कंपनीने विकसित केलेल्या विविध वाणांची माहिती त्यांनी सांगितली.
पिक लागवडीपूर्वी नियोजन महत्वाचे : बी डी जडे
जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेती करण्या आधी शेतकऱ्यांनी पिक लागवडीपूर्वी नियोजन करणे महत्वाचे आहे . तूर लागवड करण्याआधी आपण हेक्टरी किती उत्पादन घेऊ शकतो हे ठरविले पाहिजे. उत्पादन वाढीसाठी पिकाची ओळख करून घ्या. तुरीला सावत्र वागणूक देऊ नका, जमिनीच्या पोतनुसार रोपांचे अंतर ठरवावे. ठिबक सिंचन, फांद्यांची, शेंगांची संख्या इत्यादी विषयी काळजी घ्यावी. दाणा मोठा, चकाकी असलेली गुणवत्तेची तूर पिकवयची असेल तर न्युट्रिशनकडे संपूर्ण लक्ष द्यावे. गादी वाफा, ठिबक सिंचन, मलचिंग इत्यादीचां चपखल वापर व्हावा. फर्टीगेशन सुयोग्य पद्धतीने व्हायला हवे. गादी वाफा कसे, किती लांबी रुंदीचे असावे, दोन गादीवाफे यातील अंतर याबाबत तांत्रिक माहिती देण्यात आली. तीन वेळा शेंडे खुडल्यामुळे फांद्यांची संख्या वाढली. एकरी सरासरी दाणे संख्या वाढून भरघोस उत्पादन घेता येते. प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन केले. यावेळी अंकुर सीडचे तुर पिकपैदासकार नरेंद्र सावरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांनीही अनुभव कथन केले. दालमील असोसिएशनचे सचिव दिनेश राठी यांनी सांगितले की, जळगाव एमआयडीसीमध्ये १०० हून अधिक दालमील आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल उपलब्ध व्हावा. दाळ करण्यासाठी गुणवत्तेचा माल पुरविला तर आर्थिकदृष्ट्या योग्य ठरेल असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक गजानन मारकड, भूषण कोठावदे (भाजीपाला विभाग) प्रगतशील शेतकरी दिनेश रघुनाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तीर्थराज इंगळे यांनी केले.