केऱ्हाळा खुर्द ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार

ग्रामपंचायत सदस्य सतीश निकम यांनी केली तक्रार

प्रतिनिधी / रावेर 

तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य सतीश निकम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

केऱ्हाळा खुर्द येतील ग्रामपंचायतीत १४ वा वित्त आयोगांतर्गत सन २०१५-१६ ते २०२०-२१ या काळात केलेल्या खर्चात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार निकम यांनी केली आहे. नियमबाह्य पद्धतीने शासकीय निधी खर्च करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतर्फे साहित्य खरेदी करतांना अवास्तव रक्क्म अदा करण्यात आली आहे. या काळात ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सदस्य सतीश निकम यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.