केळी तंत्रपुष्प : जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जैविक खतांचा वापर महत्वाचा : प्रदीप कोठावदे
मृगधारा फौंडेशन व ॲग्री सर्च उद्योग समूहातर्फे रावेरला चर्चासत्र
प्रतिनिधी/रावेर
शेती करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल झाला असून रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्याने जमिनीतील सूक्ष्मजिवांचा ऱ्हास झाला आहे. जमिनीचे आरोग्य पूर्ववत आणण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर करावा असे आवाहन अग्री सर्च(इंडिया) उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावदे यांनी केले.
मृगधारा फौंडेशन व ॲग्री सर्च उद्योग समूहातर्फे येथील अग्रसेन भवनात केळी तंत्रपुष्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अग्री सर्च उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावदे, निवृत्त अतिरिक्त संचालक डॉ सतीश भेंडे, प्रगतीशील शेतकरी प्रभाकर दत्तू महाजन, अग्री सर्च संचालक सुधाकर गानू, संचालक दिनकर बोरोले, झोनल मॅनेजर भरत तिवारी, शास्त्रज्ञ डॉ ओमप्रकाश हिरे, डॉ. गौरव घोरमाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी “केळी पिकामध्ये जैविक उत्पादनांचे महत्व व उत्पादन वाढीसाठी योग्य वापर” या विषयावर उपस्थित केळी उत्पादक शेतकऱ्यांना श्री कोठावदे यांनी मार्गदर्शन केले.
श्री कोठावदे पुढे म्हणाले की, अन्ननिर्मितीसाठी जमीन महत्वाचा घटक आहे. मात्र अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी जमिनीत बेसुमार रासायनिक खतांचा वापर होत असून ही भविष्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करून त्यावरील अवलंबित्व कमी करावे व जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी जैविक उत्पादनांचा अधिक वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. केळी पिकासाठी फक्त एन.पी.के. गरजेचे नसून जैविक उत्पादनाचा वापर केल्यास पिकाला अन्नद्रव्यांचा मुबलक पुरवठा होतो. याचा परीन्म जमिनीचे आरोग्य सुधारण्यासह पिकांच्या उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होते असा विश्वास श्री कोठावदे यांनी यावेळी व्यक्त केला.
केळी तंत्रपुष्प सत्रामध्ये निर्यातक्षम व उच्च केळीच्याउत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व ओरीजीनोचा प्रभावी वापर याबद्दल मृदा शास्त्रज्ञ डॉ ओमप्रकाश हिरे यांनी, जैविक–अजैविक ताण,सुत्रकृमी व बनाना ऋत व्हिविलचे एकात्मिक व्यवस्थापन यावर डॉ गौरव घोरमाडे यांनी, अग्री सर्च कंपनीचे केळी पिकासाठी उपयुक्त ठरलेले नवीन उत्पादन “रोसिवा” याबद्दल प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधाकर गानू यांनी तर सुत्रसंचलन रिजनल मार्केटिंग मॅनेजर डॉ प्रवीण बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिजनल सेल्स मॅनेजर भूषण वाणी व जितेंद्र पाटील, हेमंत चौधरी, विजय पाटील, पराग गानू, राजेश महाजन, सदशिव खैरनार, भूषण देशमुख, पवन महाजन, धनराज पाटील, मुकेश वाघ, नंदलाल धनगर व ॲग्री सर्च टीमने परिश्रम घेतले.

krushisewak 
