SUCCESS STORY : केळी पट्ट्यात मोरगावच्या माजी विक्रीकर अधिकाऱ्याचा रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग

अपघाताने दिला आयुष्याला युटर्न : दोन वर्षात २५ लाखांचे उत्पन्न

SUCCESS STORY : केळी पट्ट्यात मोरगावच्या माजी विक्रीकर अधिकाऱ्याचा रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग
SUCCESS STORY : केळी पट्ट्यात मोरगावच्या माजी विक्रीकर अधिकाऱ्याचा रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग
SUCCESS STORY : केळी पट्ट्यात मोरगावच्या माजी विक्रीकर अधिकाऱ्याचा रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग
SUCCESS STORY : केळी पट्ट्यात मोरगावच्या माजी विक्रीकर अधिकाऱ्याचा रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग

कृष्णा पाटील/रावेर

केळी उत्पादनात रावेर तालुका देशात अग्रेसर आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादन असल्याने जागतिक बाजार पेठेत रावेरच्या केळीने निर्यातीत आपले स्थान कायम टिकवून ठेवले आहे. केळी बेल्ट असलेल्या या तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील रवींद्र वामनराव पाटील या माजी विक्रीकर अधिकाऱ्याने रेशीम शेतीचा प्रयोग केला. हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला असून महिन्याकाठी या व्यवसायातून त्यांना लाखाच्यावर उत्पन्न मिळत आहे.

मोरगाव खुर्द हे तसे रावेर तालुक्यातील समाजिक, राजकीय व शैक्षणिकदृष्ट्या संपन्न गाव समजले जाते. या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असला तरी शेतीला पूरक व्यवसाय करणारे शेतकरीही येथे पाहायला मिळतात. रवींद्र पाटील हे याच गावचे मूळ रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए., डी.बी.एम., एल.एल.बी. आहे. शिक्षण घेतल्यावर त्यांना विक्रीकर विभागात(आताचा जीएसटी)  मुंबई येथे विक्रीकर अधिकारी वर्ग-१ या पदावर नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे ते मुंबईत वास्तव्यास होते.

अपघाताने आयुष्याला यु-टर्न

मुंबईत विक्रीकर विभागात १७ वर्षे सेवाकाळ पूर्ण होत असतांना २ एप्रिल २००१ रोजी त्यांचा जीवघेणा अपघात झाला. कामानिमित्त रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षा पलटी झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात डोक्याला ४० टाके पडले, कान तुटला, उजवा डोळा बाहेर आला,उजवा कॉलर बोन तुटला, उजव्या हाताची चार बोटे तुटली, एकही बरगडी शिल्लक राहिली नव्हती त्यामुळे या अपघातातून वाचण्याची शक्यता व शाश्वती राहिली नव्हती. अपघातानंतर मुंबईत मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. लाखो रुपये उपचारासाठी खर्च केले. मात्र फारसा फरक पडत नव्हता. उपचार करणारे डॉक्टरही हतबल झाले होते. तेव्हा डॉ राममूर्ती यांनी त्यांना मुंबई सोडण्याचा व जन्मभूमीत परतण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार सुरुवातीला ७ दिवसांची रजा टाकून मोरगाव या मूळ गावी राहायला आले. गावचे वातावरण, खेड्यातील शेतकऱ्यांची लगबग व निसर्ग सानिध्य यामुळे त्यांच्या तब्बेतीत फरक पडला. त्यानंतर त्यांनी पुन्हा १५ दिवस, त्यांनतर १ महिना रजा टाकली. साधारण पावणे दोन महिन्याच्या काळात त्यांच्या तब्बेतीत मोठी सुधारणा झाल्याने अखेर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत गावी राहणेच पसंत केले.

नोकरीला रामराम...धरली शेतीची वाट

जन्मभूमीचे वातावरण मानवल्याने त्यांनी पुन्हा मुंबईत जाण्याचा विचार सोडून दिला. रावेर येथे त्यांनी एक टुमदार बंगला बांधला. रवींद्र पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित २५ एकर शेती आहे. तसेच १० एकर शेती ते भाडेपट्ट्याची करतात. यामध्ये केळी, कापूस, हळद, मका, तूर अशी पिके घेतात.

जैन तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर

एकूण ३५ एकर शेतीपैकी दरवर्षी १२ ते १५ एकरवर त्यांची केळीची लागवड असते. केळीच्या लागवडीसाठी ते प्रामुख्याने जैन टिश्युकल्चर रोपांचा वापर करतात. त्याचप्रमाणे जैन ठिबक, जैन पाईप, व इतर जैन तंत्रज्ञानाचा वापर करतात. १०० टक्के शेती सिंचनाखाली असून सिंचनासाठी ३ ट्यूबवेल व १ विहीर आहे.

...आणि रेशीम शेतीला सुरुवात

केळीसह विविध पिकांचे उत्पादन घेत असतांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणारे पिक श्री पाटील शोधत होते. याचवेळी त्यांना गावातीलच सोपान हिरामण पाटील यांनी रेशीम शेतीची माहिती दिली. सोपान पाटील यांचा सेंद्रिय गुळ निर्मितीचा व्यवसाय आहे. उत्सुकतेपोटी रेशीम शेतीची आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न श्री पाटील यांनी केला. त्यांना किनगाव(ता यावल) येथील विनय साहेबराव पाटील यांच्या रेशीम शेतीची माहिती मिळाली. श्री पाटील यांनी थेट किनगाव गाठून लागवडीपासून ते कोष काढणीपर्यंत तंत्रज्ञान समजून घेतले. रेशीम शेती करण्याचा निश्चय करीत २ वर्षापूर्वी मोरगाव येथे रेशीम शेतीला सुरुवात केली.

दोन वर्षात २५ लाखाचे उत्पन्न

रवींद्र पाटील यांनी २०२४ मध्ये दोन एकर क्षेत्रावर व्ही-१ या जातीच्या तुतीची लागवड केली. त्यांनतर त्यांनी चॉकी आणून रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोष निर्मिती केली. दोन वर्षात आतापर्यंत त्यांनी २०० अंडीपुंजाच्या १५ बच घेतल्या आहेत. त्यातून त्यांना आतापर्यंत सुमारे २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण शेड

रेशीम कोष निर्मितीसाठी त्यांनी ६०*३० आकाराचे प्रशस्त शेड शेतात उभारले आहे. यासाठी त्यांना जिल्हा रेशीम विकास अधिकारी राकेश जोशी व वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक पावन कळमकर यांनी मार्गदर्शन केले. या उद्योगासाठी त्यांना शासनाकडून आतापर्यंत २ लाख ४२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

 योग्य व्यवस्थापन

उन्हाळ्यात शेडमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी चोहोबाजूंनी ग्रीननेटचा वापर केला आहे. तर छतावरील पत्र्यांवर फोगर बसवल्याने त्यांनी ४५ अंश सेल्सियस तापमानातही यशस्वीपणे बच घेतली आहे. चॉकी आणण्यापासून ते कोष मार्केटला नेण्यापर्यंत सर्व कामे श्री पाटील यांचा पुतण्या किशोर पाटील पाहतात. किशोर पाटील यांनी रेशीम उद्योगाचे कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. केवळ इतर शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे त्यांनी गेल्या दोन वर्षापासून घेतलेल्या प्रत्येक बच यशस्वी केल्या आहेत. रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वीपणे केल्यावर श्री पाटील यांचा आत्मविश्वास बळावर आहे. आता पुन्हा दुसरे शेड उभारण्याच्या तयारीत असून वाढीव क्षेत्रावर त्यांनी तुतीची लागवड केली आहे.

असे उत्पन्न...असा खर्च

२०० अंडीपुंजच्या बचसाठी खर्च -३५,००० ते ४०,०००

(चॉकी, मजूर, वाहतूक व इतर)

कोष निर्मिती प्रती बच -१८० ते २२५ किलो(सरासरी २०० किलो)

मिळणारा भाव – ७०० ते ८०० रुपये प्रती किलो(सरसरी ७५० रुपये)  

 

 “केळी उत्पादनात शेतकऱ्यांना नेहमीचा कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांना सामोरे जावे लागते. उत्पादनासाठी लागलेला खर्चीही वसूल होत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ येते. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची जोड दिल्यास या व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळते तसेच नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत नाही.”

------ रवींद्र वामनराव पाटील, शेतकरी,मोरगाव खुर्द ता रावेर

      मो. 9370602049