कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचा आज श्रद्धावंदन दिन : पित्याचे जनकल्याणाचे अधुरे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा पुत्र आमदार अमोल जावळे यांचा प्रयत्न
स्व जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातपुडा पायथ्यात ‘सप्तसरिता जलपुनर्भरण सप्ताह’ राबविणार
प्रतिनिधी/रावेर
सत्तेचा आणी पदाचा वापर जर समाजाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणी दृरदृष्टिकोन ठेवून पर्यावरणाचा समतोलपणा साधण्यासाठी करणारा लोकप्रतिनिधी कायम जनतेच्या स्मरणात राहतो. शेतकरीपुत्र असलेले माजी खासदार तथा आमदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांनी सत्तेच्या व राजकारणाच्या पलीकडे जाऊन रावेर यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आज प्रगतीपथावर असलेला मेगा रिचार्ज प्रकल्प हे त्याचेच प्रतीक आहे. भुगार्भातील जलपातळी वाढविण्यावर भर देत त्यांनी शेतीच्या सिंचणासाठी लागणाऱ्या पाण्याचे संकट काही अंशी दूर करण्याचा त्यांच्या काळात प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्याने त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले होते. समाजसेवेचा वारसा व जनतेशी, शेतकऱ्यांशी कुटूंबाची असलेली नाळ याचा पगडा स्व. जावळे यांचे सुपुत्र व रावेर विधानसभा मतदार संघांचे दमदार आमदार अमोल जावळे यांचा कायम राखण्याचा प्रयत्न आहे. स्व. हरिभाऊ जावळे यांचा आज( दि. 16 jun)श्रद्धावंदन दिन. या दिनाच्या निमित्ताने आमदार जावळे यांनी पित्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रावेर यावल तालुक्याच्या पायथ्याच्या परिसरात सात नद्यांचे पाणी अडवून "सप्तसरिता जलपुनर्भरण सप्ताह " राबविण्याचा केलेला निश्चिय भावी काळातील भुगार्भातील संकट दूर करणारे ठरणार आहे.
माजी खासदार तथा आमदार, कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या ६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. १६ जूनपासून रावेर-यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत पायथा परिसरात ‘सप्त सरिता जलपुनर्भरण सप्ताह’ राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भूजल संवर्धन, पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त पुनर्भरण आणि जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मागील काही वर्षांपासून रावेर-यावल तालुक्यातील भूजल पातळीत सातत्याने होत असलेली घट लक्षात घेऊन भूगर्भीय जलशास्त्रीय अभ्यास तसेच तज्ज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनानुसार जलपुनर्भरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मूळ नैसर्गिक स्थळांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी पावसाचे व पुराचे पाणी अधिकाधिक प्रमाणात जमिनीत मुरण्यासाठी विविध जलसंवर्धन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये हडकाई, खडकाई, मोर, सुकी आणि भोकर या नद्यांबरोबरच इजवाय व गोगाई नदी-नाल्यांमध्ये आडवे भूचर खोदण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पुराचे पाणी अधिक प्रमाणात जमिनीत मुरून भूजल साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.
स्व. हरिभाऊ जावळे यांनी २०१९ मध्ये लोकसहभागातून राबविलेल्या ‘थेंब अमृताचा जलक्रांती अभियान’ अंतर्गत सातपुडा पायथ्यातील बझाडा झोनमधील नदी-नाल्यांमध्ये आडवे भूचर खोदण्यात आले होते. या प्रयोगामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे व पुराचे पाणी जमिनीत मुरले आणि परिसरातील भूजल पातळी स्थिरावण्यास मदत झाली. विशेषतः भूजलावर अवलंबून असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ झाला होता.
यंदा मध्यपूर्व प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या एल निनोच्या प्रभावामुळे दक्षिण आशियात, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मागील वर्षीही सातपुडा परिसरात कमी पाऊस झाल्याने अनेक नदी-नाल्यांना अपेक्षित पूर आला नव्हता. परिणामी भूजल पुनर्भरणाचे प्रमाण घटून अनेक भागांत भूजल पातळी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याचा संकल्प करण्यात आला असून, नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे आवाहन करण्यात आले आहे. आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

krushisewak 
