सुकी, भोकर नदीला पूर - अंदालवाडीतून व्यक्ती वाहून गेल्याची भीती : अभोड्याजवळील पूल वाहून गेल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद

सुकी, तापीनदी काठावरील गावांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा

सुकी, भोकर नदीला पूर - अंदालवाडीतून व्यक्ती वाहून गेल्याची भीती : अभोड्याजवळील पूल वाहून गेल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद

प्रतिनिधी /रावेर 

गुरुवारी रात्रीपासून तालुक्यात व सातपुडा पर्वतात जोरदार पाऊस पडत असल्याने सुकी व भोकर नदीला मोठा पूर आला आहे. अंदलवाडी येथे रक्षाबंधनासाठी आलेला पाहुणा सुकी नदीच्या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून या व्यक्तीचा शोध जारी आहे. अभोडा गावाजवळील पाल रस्त्यावरील पूल नदीच्या पुरात वाहून गेल्याने सतर्कता म्हणून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याची माहिती तहसीलदार बी ए कापसे यांनी दिली. सुकी व तापीनदी काठावरील गावांतील नागरिकांना सावधगिरी व सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सातपुड्याच्या पर्वत रांगा व तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. यामुळे सुकी नदीवरील धरणाच्या सांडव्यावरून एक मिटर पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडला जात असल्याने या नदीला मोठा पूर आला आहे. या नदीवर असलेला उटखेडा-सावखेडा, कुसुम्बा-लोहारा हे पूल पाण्याखाली गेल्याने हे रस्ते वाहतुकीसाठी सकाळपासून बंद करण्यात आले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी असल्याने पुरात वाहने टाकू नये तसेच कोणीही पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनातर्फे तहसीलदार श्री कापसे यांनी केले आहे.

अंदलवाडीतून पाहुणा वाहून गेल्याची भीती 

रक्षाबंधनासाठी पाहुणा म्हणून आलेली व्यक्ती सुकी नदीच्या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाहून गेलेल्या व्यक्तीचा नातेवाईक व पट्टीच्या पोहणाऱ्याकडून शोध घेतला जात आहे. व्यक्ती वाहून गेल्याच्या घटनेला तहसीलदार श्री कापसे यांनी दुजोरा दिला आहे