महाविकास आघाडीतर्फे रावेरला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन
अंत पाहिल्यास जनता रस्त्यावर उतरेल धनंजय चौधरी यांचा इशारा
प्रतिनिधी /रावेर
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा व राज्य सरकारचा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
बदलापूर येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामुळे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यावेळी एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी राज्यात महायुतीतर्फे सुरु असलेल्या कारभारावर टीका केली. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी करत जनतेच्या रोषाचा राज्य सरकारने अंत पाहू नये, नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा धनंजय चौधरी यांनी यावेळी दिला. आंदोलनवेळी शिवसेना उबाठा गट जिल्हा संपर्क प्रमुख प्रल्हाद महाजन, जिल्हा उप प्रमुख योगीराज पाटील, तालुका प्रमुख अविनाश पाटील, रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुकाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, बाजार समितीचे उप सभापती योगेश पाटील, माजी नगरसेवक एड योगेश गजरे, धुमा तायडे, सावन मेढे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे अर्धा तास हे निषेध आंदोलन सुरु असल्याने रस्त्याच्या चहुबाजूनी वाहने थांबली होती. पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल कर्मचाऱ्यांसह आंदोलनस्थळी उपस्थित होते.